• Mon. Sep 21st, 2026

‘लोकसंवाद’ अभियानातून रोजगाराच्या संधी; राज्यात २९ सप्टेंबरला एक हजार रोजगार मेळावे – मंत्री मंगल प्रभात लोढा – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 21, 2026

मुंबई, दि. २१: राज्यातील युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एक हजार रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ रोजगार मेळाव्यांमध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.

माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘लोकसंवाद–२०२६’ अभियानांतर्गत गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत मुंबई शहर व मुंबई उपनगरातील विविध गणेश मंडळांमध्ये नागरिकांशी संवाद साधून रोजगार मेळावे आणि उपलब्ध रोजगाराच्या संधींबाबत माहिती देण्यात आली.

मलबार हिल येथील मीनल क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रशांत जाधव, उपाध्यक्ष निंगेश कोरे, राजीव मेहता, सागर पेंढारक, आयेशा कुरेशी इतर पदाधिकारी, सदस्य व भक्तगण यावेळी उपस्थित होते. यावेळी मुंबई शहर जिल्ह्यातील रोजगार मेळाव्याबाबत कौशल्य विकास अधिकारी विद्या शिंगे, समन्वयक अजय कांबळे, तसेच माहिती व जनसंपर्क विभागाच्या विभागीय संपर्क अधिकारी संध्या गरवारे, श्रद्धा मेश्राम आणि अश्विनी पुजारी यांनी नागरिकांशी संवाद साधून रोजगार महाकुंभाची माहिती दिली.

राज्यातील युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि आवडीनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. प्रत्येक तालुक्यात रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून स्थानिक युवकांना विविध आस्थापना व उद्योगांमधील रोजगाराच्या संधींची माहिती मिळणार आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या प्रमुख योजनांबाबत जनजागृती

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती, नवबौद्ध, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथीय तसेच इतर दुर्बल घटकांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबविण्यात येतात.  मॅट्रिकोत्तर, सावित्रीबाई फुले व राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य दिले जाते. स्वाधार व शासकीय वसतिगृह योजनांतून निवास व आवश्यक सुविधा उपलब्ध होतात. रमाई आवास योजनेतून घरकुलासाठी आर्थिक सहाय्य, तर मुख्यमंत्री वयोश्री व संजय गांधी निराधार योजनेतून ज्येष्ठ नागरिक आणि निराधारांना आधार दिला जातो.

या योजनांद्वारे शिक्षण, निवास, आर्थिक सहाय्य व सामाजिक सुरक्षेला बळ देत दुर्बल घटकांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती लोकसंवाद अभियान अंतर्गत देण्यात आली.

महिला व बालकांच्या संरक्षण, पोषण, शिक्षण व सक्षमीकरणासाठीच्या विविध योजना आणि सेवांची माहिती

महिला व बालकांच्या संरक्षण, पोषण, शिक्षण, सक्षमीकरण आणि पुनर्वसनासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत विविध योजना व सेवा राबविण्यात येतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, वन स्टॉप सेंटर, शक्ती सदन, आदर्श अंगणवाडी, बेबी केअर किट, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आणि पोषण अभियान या योजनांच्या माध्यमातून महिला व बालकांना विविध स्वरूपाचे सहाय्य दिले जाते.

अंगणवाडी सेवांद्वारे पूरक पोषण, आरोग्य तपासणी, लसीकरण, पूर्व-प्राथमिक शिक्षण तसेच पोषणविषयक मार्गदर्शन दिले जाते. महिलांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगामार्फत समुपदेशन व कायदेशीर मार्गदर्शन, तर बालकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी तक्रारींवर कार्यवाही केली जाते. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गट, कौशल्यविकास आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यात येते. महिला हेल्पलाईन १५५२०९ आणि बाल हेल्पलाईन १०९८ या सुविधांबाबतही यावेळी माहिती देण्यात आली.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत असल्याने त्याच ठिकाणी शासकीय योजनांची माहिती थेट पोहोचविण्याचा हा अभिनव उपक्रम नागरिकांसाठी उपयुक्त ठरत असून, त्यांच्या प्रश्नांना संबंधित अधिकाऱ्यांकडून तत्काळ मार्गदर्शन मिळत असल्याने ‘लोकसंवाद’ उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

००००

अश्विनी पुजारी/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed