• Mon. Sep 21st, 2026

सेवा संकल्प अभियानांतर्गत मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते लाभार्थींना प्रमाणपत्रे, किट व नियुक्ती आदेशांचे वाटप – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 21, 2026

सोलापूर, दि. २१ (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ दि. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राज्यभर राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात विविध शासकीय योजनांच्या लाभार्थींना प्रमाणपत्रे, किट तसेच नवनियुक्त उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वितरण राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संजय गांधी निराधार योजना (शहर), श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच पुरवठा विभागातील लाभार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच पात्र लाभार्थींना कुणबी जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. जिल्ह्यातील नवनियुक्त उमेदवारांना नियुक्ती आदेशांचेही वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत लाभार्थींना बँक मंजूर प्रकरणांची कागदपत्रे तसेच योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले.

यावेळी जिल्ह्यातील उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटांनी गणेशोत्सव व गौरी-गणपती महोत्सव 2026 मध्ये सुमारे 1 कोटी 65 लाख रुपयांची उलाढाल केली. या माध्यमातून महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू व खाद्यपदार्थांना बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत झाली. या उल्लेखनीय सहभागाबद्दल महिला बचत गटांचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून विविध शासकीय योजना, सेवा व उपक्रमांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे. विविध विभागांच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थींना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासोबतच लाभार्थींना आवश्यक प्रमाणपत्रे, कागदपत्रे व साहित्याचे वितरण करण्यात येत आहे.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, महापौर विनायक कोंड्याल, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे, आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, राजू खरे, नारायण पाटील, अभिजीत पाटील, अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed