• Sun. Sep 20th, 2026

सेवा संकल्प अभियानांतर्गत ४१ अनुकंपा उमेदवारांना नियुक्तीची शिफारसपत्रे; पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते वितरण – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 20, 2026

चंद्रपूर, दि. २०: सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती प्रक्रियेला गती देत जिल्ह्यातील ४१ अनुकंपा उमेदवारांना नियुक्तीची शिफारसपत्रे प्रदान करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित विशेष मेळाव्यात आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते उमेदवारांना शिफारसपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, विधान परिषद सदस्य सुधाकर अडबाले, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्याचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर ओढवणाऱ्या आर्थिक संकटातून कुटुंबाला आधार मिळावा, या उद्देशाने अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीची तरतूद आहे. त्यानुसार प्रलंबित प्रकरणांवर आवश्यक प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून पात्र उमेदवारांना नियुक्तीची शिफारसपत्रे देण्यासाठी सेवा संकल्प अभियानांतर्गत विशेष प्रयत्न करण्यात आले.

नियुक्तीसाठी दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांच्या प्रकरणांचा पाठपुरावा करून आवश्यक कागदपत्रे, प्रशासकीय प्रक्रिया आणि संबंधित विभागांशी समन्वय साधण्यात आला. या प्रयत्नांमुळे ४१ उमेदवारांच्या नियुक्ती प्रक्रियेला गती मिळाली असून शिफारसपत्र प्राप्त झाल्याने संबंधित उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.

अनुकंपा नियुक्तीची प्रक्रिया ही संबंधित कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाची असून प्रलंबित प्रकरणे नियमानुसार आणि विहित प्रक्रियेत निकाली काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष नियोजन केले. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून नागरिकांशी निगडित प्रलंबित प्रशासकीय बाबींचा निपटारा करण्यास प्राधान्य देण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून हा विशेष मेळावा आयोजित करण्यात आला.

महिनाभराच्या नियोजनातून प्रक्रिया पूर्ण 

जिल्हाधिकारी वसुमना पंत तसेच निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही प्रक्रिया राबविली. अनुकंपा उमेदवारांच्या प्रकरणांची पूर्तता करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मागील महिनाभर सातत्याने काम केले. उमेदवारांच्या प्रकरणांची छाननी, आवश्यक दस्तऐवजांची पूर्तता, विभागीय समन्वय आणि शिफारसपत्र वितरणाची प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आली. विशेषतः सोनाली लांडे आणि सुरेश राठोड यांनी नियमित कार्यासनाचे कामकाज सांभाळून अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत कार्यक्रमात त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

४१ कुटुंबांना मिळणार आधार

अनुकंपा नियुक्तीची शिफारसपत्रे प्राप्त झाल्याने ४१ उमेदवारांच्या शासकीय सेवेत नियुक्तीच्या पुढील प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. कुटुंबातील कमावत्या शासकीय कर्मचाऱ्याच्या निधनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत संबंधित कुटुंबाला आर्थिक व सामाजिक आधार देण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed