रत्नागिरी, दि. १६ (जिमाका): राज्यातील विविध भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने गठीत केलेली उच्चस्तरीय समिती कोकण विभागाच्या दौऱ्यावर येत आहे. समितीचे अध्यक्ष व सदस्य मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता चेतना कॉलेज, वांद्रे (पूर्व), मुंबई येथे भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोकण विभागातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शैक्षणिक संस्था व तज्ज्ञांकडून सुधारणांबाबत लेखी सूचना, अभिप्राय व निवेदने मागविण्यात आली आहेत. शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या भरती परीक्षांची पद्धत अधिक गतिमान व त्रुटीमुक्त व्हावी यासाठी या उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. कोकण विभागातील संबंधित घटकांना समितीसमोर आपले म्हणणे, सूचना मांडता याव्यात यासाठी २९ सप्टेंबर रोजी चेतना कॉलेज (जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या कार्यालयाजवळ, सर्व्हे नं. ३४१, चेतना महाविद्यालय मार्ग, वांद्रे-पूर्व, मुंबई – ५१) येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
२३ सप्टेंबरपर्यंत वेळ मागता येणार
समितीच्या भेटीदरम्यान प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्यासाठी वेळ मागणे अथवा आपले लेखी निवेदन सादर करण्यासाठी दि. १५ ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत खालील पर्यायांचा वापर करता येईल:
१. प्रत्यक्ष अर्ज सादर करणे: अपर जिल्हा उपजिल्हाधिकारी यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, ९ वा मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०० ०५१ येथे सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:३० या वेळेत आपले पत्र/निवेदन देता येईल.
२. ई-मेलद्वारे अर्ज: इच्छुक नागरिक, संस्था आपले अभिप्राय किंवा भेटीच्या वेळेसाठी [email protected] या ई-मेलवर अर्ज पाठवू शकतात.
भरती प्रक्रियेत सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वपूर्ण असून कोकण विभागातील सर्व स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि सुजाण नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या महत्त्वपूर्ण सूचना सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
०००