मुंबई, दि. १ : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे आधुनिक मासळी बाजार, शीतगृह, मासळी विक्री केंद्र तसेच आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शासनस्तरावर सकारात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. मालेगाव आणि सांगली येथील मासळी बाजाराचे काम अत्याधुनिक आणि गतीने पूर्ण करण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.
मंत्रालयात झालेल्या बैठकीत मत्स्यव्यवसाय मंत्री राणे बोलत होते. बैठकीला मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्य आयुक्त भानुदास पालवे तर दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार भावना गवळी, जिल्हाधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. सांगली मासळी बाजाराबाबतच्या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका आयुक्त संजीता मोहपात्रा उपस्थित होत्या.
मालेगाव येथे मासळी बाजार उभारण्यासाठी योग्य जागा तातडीने निश्चित करून त्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर प्रकल्पासाठी आवश्यक तो पाठपुरावा करून मालेगाव येथे आधुनिक, सर्व सुविधांनीयुक्त आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन मासळी बाजार उभारण्यासाठी शासनस्तरावर कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री श्री. राणे यांनी दिली.
मासळी बाजारासोबतच शीतगृह, मासळी विक्री केंद्र आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे स्थानिक मासळी विक्रेते तसेच मच्छीमारांना व्यावसायासाठी अधिक चांगल्या सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. नागरिकांनाही स्वच्छ व सुसज्ज ठिकाणी मासळी खरेदीची सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत विकसित होत असलेल्या सांगली येथील आधुनिक मासळी बाजाराच्या बांधकामाच्या सद्यस्थितीचाही आढावा घेण्यात आला. सांगली येथील मासळी बाजाराचे काम गतीने पूर्ण करून उद्घाटनाची तारीख लवकर निश्चित करावी, असे र्निदेश मंत्री राणे यांनी दिले.
या आधुनिक मासळी बाजारामुळे सांगलीतील मच्छीमार, मासळी विक्रेते आणि नागरिकांना आधुनिक व सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार आहेत. मासळी व्यावसायाला अधिक शिस्तबद्ध आणि आधुनिक स्वरूप देण्यास मदत होणार आहे. प्रकल्पाचे काम वेळेत आणि अत्याधुनिक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देशही मंत्री श्री. राणे यांनी दिले.
0000
धोंडिराम अर्जुन/विसंअ