• Mon. Aug 31st, 2026

आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न जारी – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 31, 2026

मुंबई, दि. ३१ : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक व नागरिकही अडकले आहेत. यातील ६७ जणांचा संपर्क व शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. ३० ऑगस्ट २०२६ पर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील एकूण बाधित नागरिक संख्या ४०५ आहे. यापैकी २६२ नागरिकांना स्वगृही आणण्यासाठी यशस्वी कार्यवाही होत असून उर्वरित ७६ संपर्कात असून सुरक्षित आहेत.

विशेष पथक काठमांडू येथे दाखल

संपर्क होऊ शकला नाही अशा पर्यटक नागरिकांच्या शोधासाठी केंद्र सरकारचे विशेष पथक काठमांडू येथे दाखल झाले असून भारताचे नेपाळमधील राजदूत यांनी देखील या पथकाची भेट घेऊन आवश्यक सूचना दिल्या आहेत. आपत्तीमुळे बाधित नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेची माहिती घेण्याबरोबरच त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनांनुसार प्रवासातील अडचणी दूर करण्याबरोबरच विविध प्रकारची मदत उपलब्ध केली जात आहे.

रिचा टूर्स प्रा. लि. या संस्थेमार्फत गेलेल्या ६० नागरिकांच्या गटाशी अद्याप थेट संपर्क प्रस्थापित झालेला नाही. तसेच अन्य ७ नागरिकांची लिंकद्वारे नोंद झाली असून त्यांच्याशीही अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. या व्यक्तींचा ठावठिकाणा व माहिती मिळविण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत.

मुख्यमंत्री कार्यालय आणि प्रशासन बाधित पर्यटक व नागरिक राज्यात सुरक्षितरित्या पोहोचावे यासाठी यावर सातत्याने लक्ष ठेवून आहे. राज्यातील आणखी ६९ नागरिक देखील पुढील प्रवास करून मुंबईत पोहोचतील. तिबेटमधील मानसरोवरजवळील सागा येथून ३७ नागरिक २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी मुंबईत सुखरूप पोहोचले आहेत. तसेच सुरक्षित असल्याची माहिती मिळालेल्या नागरिकांपैकी नागपूरमधील १०५ नागरिक भारतात परतले आहेत.

पूरस्थितीमुळे निर्माण झालेल्या या कठीण परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून त्यांच्या परतीसाठी आवश्यक कार्यवाही करीत आहे.

0000

किरण वाघ/विसंअ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed