• Thu. Aug 27th, 2026

Pune News: पुण्यात शाळा-महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरातील पानटपऱ्यांवर मोठी कारवाई; १९ टपऱ्या निष्कासित

श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी-चिंचवड : शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ तसेच सिगारेटची विक्री करणाऱ्या पानटपऱ्यांविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात असलेल्या अशा टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले होते. त्यानुसार परिमंडळ-१ अंतर्गत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण १९ पानटपऱ्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शाळा व महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ आणि सिगारेटची विक्री करणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड आणि अपर पोलीस आयुक्त, प्रादेशिक विभाग बसवराज तेली यांनी सर्व पोलीस ठाण्यांना निर्देश दिले होते.

या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून संबंधित पोलिसांच्या बंदोबस्तात अतिक्रमण विभागाने कारवाई केली. निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन, चिंचवडमध्ये दोन, संत तुकारामनगरमध्ये सहा, दापोडीत तीन आणि सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. अशा प्रकारे एकूण १९ टपऱ्या निष्कासित करण्यात आल्या.

शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थ्यांना तंबाखू, सिगारेट आणि अन्य व्यसनाधीन पदार्थ सहज उपलब्ध होऊ नयेत, तसेच सार्वजनिक आरोग्य आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त परिमंडळ-१ संदीप आटोळे, संबंधित सहायक पोलीस आयुक्त आणि पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नागरिकांच्या आरोग्यास आणि सुरक्षिततेस प्राधान्य देत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.