• Mon. Aug 24th, 2026

Pune Women Police: पुण्यातील दोन महिला पोलीस एकमेकींच्या प्रेमात पडल्या, रविवारी विवाहबद्ध होणार; सुट्टीच्या अर्जात काय सांगितलं?

श्रीकृष्ण पांचाळ, पुणे: पोलिस दलात कर्तव्य बजावत असतानाच दोन महिला पोलिसांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. दोघींनी समलैंगिक विवाहासाठी सुट्टीचा अर्ज केला असून, येत्या ३० ऑगस्ट रोजी आळंदी येथे वैदिक पद्धतीने विवाह करण्याची तयारी केली आहे. या निर्णयामुळे पिंपरी- चिंचवड पोलिस दलात चर्चेला उधाण आले आहे.

दोघींची ओळख पोलिस भरतीच्या काळात झाली. पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्या पिंपरी-चिंचवडमध्ये आल्या आणि भरती प्रक्रियेतील सर्व टप्पे पार करत पोलिस शिपाई म्हणून सेवेत दाखल झाल्या. प्रशिक्षणानंतर काही काळ दोघी मुख्यालयात नियुक्त होत्या. त्याच काळात त्या इतर महिला पोलिस कर्मचाऱ्यांसोबत एकाच ठिकाणी वास्तव्यास होत्या. यानंतर शहरातील मध्यवर्ती भागातील एकाच पोलिस ठाण्यात दोघींची नियुक्ती झाली. कालांतराने त्यांच्यातील जवळीक वाढत गेली आणि दोघींनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या नात्याची माहिती एका महिला पोलिसाच्या कुटुंबीयांनाही मिळाली. कुटुंबीयांनी या नात्याला विरोध केल्याची माहिती आहे.

कुटुंबीयांनी या विवाहाला विरोध करण्यासाठी पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही धाव घेतल्याचे समोर आले आहे. मात्र, हा दोघींच्या वैयक्तिक आयुष्याचा विषय असल्याने पोलिस प्रशासनाकडून विवाह रोखण्याऐवजी आवश्यक असल्यास समुपदेशन करण्याची भूमिका घेतल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, दोघींनी विवाहासाठी पोलिस ठाण्यात अधिकृतपणे सुट्टीचा अर्ज सादर केला आहे. विशेष म्हणजे या अर्जासोबत त्यांनी लग्नपत्रिकाही जोडली आहे. त्यामुळे आतापर्यंत पोलिस दलात चर्चेत असलेले त्यांचे नाते आता अधिकृतपणे समोर आले आहे.

एका महिला पोलिसाकडून लिंगबदल उपचार सुरू

या दोघींपैकी एका महिला पोलिसाने लिंगबदलाशी संबंधित वैद्यकीय उपचार सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी ती मुंबईतील एका रुग्णालयात उपचारासाठी गेल्याचे सांगितले जाते. मात्र, या उपचारांचा आणि प्रस्तावित विवाहाचा कायदेशीर परिणाम काय असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

पिंपरी-चिंचवड पोलिस दलात याआधीही लिंगबदलाचा प्रकार

पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील आणखी एका महिला कर्मचाऱ्याने लिंगबदलाची शस्त्रक्रिया केल्याची माहिती आहे. जिल्हा बदलीच्या माध्यमातून बीड येथून पिंपरी-चिंचवड पोलिस दलात आलेल्या या कर्मचाऱ्याने शासनाची परवानगी घेऊन शस्त्रक्रिया केल्याचे सांगितले जाते. शस्त्रक्रियेनंतर स्वतःची नोंद पुरुष पोलिस कर्मचारी म्हणून करण्यात यावी, अशी मागणी संबंधित कर्मचाऱ्याने शासनाकडे केली आहे. मात्र, पोलिस भरतीच्या वेळी महिला उमेदवार म्हणून मिळालेल्या सवलती आणि आरक्षणाच्या निकषांचा विचार करता, तिच्या सेवावर्गातील नोंदीबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती आहे.

दरम्यान, एकीकडे पोलिस दलातील दोन महिला कर्मचाऱ्यांचा विवाहाचा निर्णय चर्चेत असताना, दुसरीकडे लिंगबदलानंतर सेवा नोंदीत बदल करण्याचा प्रश्नही समोर आला आहे. त्यामुळे बदलत्या सामाजिक वास्तवासोबत प्रशासन आणि कायद्यासमोरही नवे प्रश्न उभे राहत आहेत.

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed