• Sun. Aug 23rd, 2026

समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान ही राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 23, 2026

मुंबई, दि.२३ : समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे ही केवळ गौरवाची बाब नसून, त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

मेघाश्रेय फाउंडेशनतर्फे अ‍ॅस्टर बॉलरूम, द सेंट रेजिस हॉटेल, मुंबई येथे आयोजित ‘सर्वोत्तम नागरिक सन्मान-२०२६’ सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, रा.स्व. संघाचे अखिल भारतीय संघटन प्रभारी रामलाल यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. विज्ञान, संशोधन, संरक्षण, शिक्षण, आरोग्य, संगीत, कला-संस्कृती, चित्रपट, सामाजिक कार्य आणि अध्यात्म अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १८ मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

राज्यपाल म्हणाले की, आजच्या काळात आयटी व्यावसायिक, डॉक्टर, आर्किटेक्ट, कलाकार, उद्योजक आणि विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या यशस्वी व्यक्तींचे एकत्र येणे ही विशेष बाब आहे. केवळ वैयक्तिक यश मिळवणे महत्त्वाचे नसून, ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी आणि प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी झाला पाहिजे.

 

भारतीय संस्कृतीत ज्ञान आणि विज्ञानाला विशेष महत्त्व आहे. शिस्त आणि स्वातंत्र्य यांचा सुंदर समन्वय भारतीय जीवनपद्धतीत दिसतो. शिस्त ही बंधन नसून स्वातंत्र्याकडे नेणारी शक्ती आहे. समाजात एकसारखेपणा अपेक्षित नसून विविधतेचा स्वीकार आणि परस्पर सन्मानातून समाज अधिक सक्षम होतो, असेही राज्यपालांनी नमूद केले.

आज सन्मानित झालेली प्रत्येक व्यक्ती समाजासाठी आदर्श आहे. त्यांच्या कार्याची ओळख अधिक व्यापक समाजापर्यंत पोहोचणे आणि युवा पिढीने त्यांच्याकडून प्रेरणा घेणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे समाजातील सकारात्मक कार्याला प्रोत्साहन मिळते, असे राज्यपालांनी सांगितले.

मनापासून योग्य वाटणाऱ्या मार्गावर चालणारेच सर्वोत्तम नागरिक– मंत्री ॲड. आशिष शेलार

मंत्री ॲड. शेलार म्हणाले की, जीवनाच्या प्रवासात अनेकदा दोन मार्ग आपल्यासमोर असतात. एक मार्ग आपल्याला लवकर यशाकडे घेऊन जातो, तर दुसरा मार्ग मनाला पटणारा असतो; मात्र त्यासाठी अधिक वेळ आणि संघर्ष करावा लागतो. मनापासून योग्य वाटणाऱ्या मार्गावर आत्मविश्वासाने चालणारेच खरे ‘सर्वोत्तम नागरिक’ ठरतात.

आज सन्मानित झालेल्या सर्व मान्यवरांनी आपल्या कार्यातून समाज आणि भारतीय संस्कृतीला समृद्ध करण्याचे काम केले आहे. कुणी सेवेतून, कुणी अभिनयातून, कुणी सामाजिक कार्यातून, तर कुणी आपल्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानातून समाजमूल्ये जपली आहेत. या सर्व मान्यवरांचे कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या कार्यातून समाजाला सकारात्मक दिशा मिळते, असे मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले. रामलाल यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

मेघाश्रेय फाउंडेशनच्या संस्थापक सीमा सिंग यांनी प्रस्तावना केली. त्यांनी ‘सर्वोत्तम नागरिक सन्मान’ उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव आणि त्यांचा प्रेरणादायी प्रवास युवा पिढीसमोर आणण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितले.

१८ मान्यवरांचा गौरव

‘सर्वोत्तम नागरिक सन्मान-२०२६’ हा मेघाश्रेय फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेला उपक्रम असून, देशाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून समाज व राष्ट्राच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा या माध्यमातून गौरव करण्यात येतो. या उपक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे.

१. हरिहरन – भारतीय संगीत, पार्श्वगायन आणि गझल क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान.

२. प्रा. ज्येष्ठराज भालचंद्र जोशी – केमिकल इंजिनिअरिंग, संशोधन आणि वैज्ञानिक नेतृत्वातील उल्लेखनीय योगदान.

३. मानद कॅप्टन योगेंद्र सिंह यादव – कारगिल युद्धातील, विशेषतः टायगर हिल मोहिमेतील अतुलनीय शौर्य; परमवीर चक्र विजेते.

४. जया किशोरी – आध्यात्मिक विचार आणि प्रेरणादायी वक्तृत्वातून युवकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी योगदान.

५. रवी किशन – खासदार, भोजपुरी व हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदान तसेच तरुणांमधील लोकप्रियता; ‘जेन झी ट्रेंडसेटर’ म्हणून गौरव.

६. लक्ष्मी अग्रवाल – ॲसिड हल्ल्यातील पीडितांच्या हक्कांसाठी सामाजिक लढा आणि जनजागृती.

७. संजीव कपूर – भारतीय पाककलेचा देश-विदेशात प्रसार आणि लोकप्रियता वाढविण्यात योगदान.

८. अशोक लक्ष्मण सराफ – मराठी चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील दीर्घ व उल्लेखनीय कारकीर्द; जीवनगौरव पुरस्काराने सन्मान.

९. डॉ. देवांश धनगर – संगणकशास्त्र आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य.

१०. सलीम मर्चंट – भारतीय चित्रपट संगीताला लोक, पारंपरिक आणि आधुनिक संगीताची जोड देणारे योगदान.

११. सुजय जयराज – शालेय शिक्षण, संस्था निर्मिती आणि शैक्षणिक नेतृत्वातील योगदान.

१२. डॉ. जलील डी. पारकर – श्वसनविकार आणि फुफ्फुसविकाराच्या उपचार क्षेत्रातील दीर्घकालीन योगदान.

१३. केदार जोशी – मराठी भाषेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसार करण्यासाठी केलेले नाविन्यपूर्ण प्रयत्न.

१४. सुभाष घई – हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शन, निर्मिती आणि चित्रपट शिक्षण तसेच भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदान.

१५. अभिमन्यू सिंह – विविध भारतीय भाषांतील चित्रपटांमध्ये प्रभावी आणि अष्टपैलू अभिनय.

१६. अहमद खान – नृत्यदिग्दर्शनासह दिग्दर्शन, निर्मिती आणि लेखनातील बहुआयामी योगदान.

१७. भूमी पेडणेकर – हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री म्हणून उल्लेखनीय योगदान.

१८. अभिषेक सिंह – हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता म्हणून योगदान.

राज्यपाल वर्मा, मंत्री ॲड. शेलार आदींच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

‘सर्वोत्तम नागरिक सन्मान’चा मुख्य उद्देश केवळ पुरस्कार देणे नसून, विविध क्षेत्रांतील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा जीवनप्रवास आणि कार्य युवा पिढीसमोर आणणे हा आहे. उत्कृष्टता, सामाजिक उत्तरदायित्व आणि राष्ट्रसेवेची भावना वाढीस लागावी, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed