• Wed. Aug 19th, 2026

दापचरी येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कृषी बाजार परिसराची मंत्री जयकुमार रावल यांनी केली पाहणी – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 19, 2026

पालघर, दि. १९ : पालघर जिल्ह्यातील दापचरी येथे १ हजार ३९५ एकर जमिनीवर लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक कृषी बाजार उभारण्यात येणार असून, यामाध्यमातून स्थानिकांसाठी यामधून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे प्रतिपादन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले. हा आंतरराष्ट्रीय कृषी बाजार महाराष्ट्रासह देशातील शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेशी थेट जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दापचरी येथे होणाऱ्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कृषी उत्पन्न बाजार प्रकल्पाच्या जागेची मंत्री रावल यांनी पाहणी केली. यावेळी पालघर अपर जिल्हाधिकारी सुभाष भागडे, अपर जिल्हाधिकारी, बाप्पासाहेब थोरात, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम आदी अधिकारी उपस्थित होते.

मंत्री रावल यांनी संपूर्ण जमिनीची  पूर्ण पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. यावेळी प्रकल्पाच्या गोशाळा परिसर, गोहर धाड कृषी विभाग, नवा मोहरा कृषी विभाग अशा विविध विभागांची पाहणी करण्यात आली.

मंत्री रावल म्हणाले, महाराष्ट्र सरकारने येथे फ्रान्समधील रुंगीस मार्केटच्या धर्तीवर अत्याधुनिक संसाधनांनी युक्त आंतरराष्ट्रीय दर्जाची जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारण्याचा संकल्प केला आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांचा शेतीमाल या बाजारात येईल. वाढवण बंदर, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि भविष्यातील विमानतळामुळे हे ठिकाण इंटिग्रेटेड मल्टी-मोडल कृषी लॉजिस्टिक्स हब म्हणून विकसित होणार आहे. येथे फळे, भाजीपाला, फुले, धान्य, मासे, दुग्धजन्य पदार्थ, मांस आदी कृषी उत्पादनांसाठी अत्याधुनिक बाजार, प्रक्रिया, पॅकिंग, साठवण आणि निर्यात सुविधा उपलब्ध होतील. हा राज्यातील आणि देशातील शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून सर्वांच्या सहकार्याने आपण हा प्रकल्प लवकर उभारणार आहोत, असेही मंत्री जयकुमार रावल म्हणाले.

स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी

या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना सर्वाधिक फायदा होणार असून, सुमारे १० हजार  रोजगाराच्या संधी निर्माण होतील. रोजगारामध्ये स्थानिक युवकांना प्राधान्य दिले जाईल. कृषी प्रक्रिया उद्योग, गोदामे, कोल्ड स्टोरेज, लॉजिस्टिक्स, पॅकिंग, वाहतूक आणि इतर पूरक सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल. तसेच स्थानिक शेतकरी आणि मच्छीमारांना आपला माल विक्रीसाठी मुंबई किंवा वाशी येथे जावे लागते; मात्र हा प्रकल्प उभारल्यानंतर त्यांच्या परिसरातच जागतिक दर्जाची बाजारपेठ उपलब्ध होईल. त्यामुळे वाहतूक खर्च कमी होईल, शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल असेही त्यांनी सांगितले.

या प्रकल्पासाठी कोणाचेही विस्थापन केले जाणार नाही. अनेक वर्षांपासून पडून असलेल्या सरकारी जमिनीचा नियोजित विकास करून हा प्रकल्प उभारला जाणार आहे. हा केवळ बाजार उभारण्याचा प्रकल्प नसून, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देत पालघर परिसराला कृषी व्यापाराचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनविण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

 जागतिक बाजारपेठेशी थेट जोडणी

वाढवण डीपवॉटर पोर्ट, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जवाहरलाल नेहरू बंदर, समृद्धी महामार्ग, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आणि वडोदरा एक्सप्रेस वे यासारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांशी जोडणीमुळे निर्यात सुलभ होऊन लॉजिस्टिक खर्चात बचत होणार आहे. फळे, भाजीपाला, फुले, धान्य, कडधान्ये, मसाले आणि प्रक्रिया केलेल्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीला या प्रकल्पातून मोठी चालना मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *