• Wed. Aug 19th, 2026

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी महाडीबीटी २.० वर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावा – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 19, 2026

मुंबई, दि. १९ : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता महाडीबीटी २.० प्रणालीवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने केले आहे.

महाडीबीटी २.० प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती (फ्रीशिप), राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक अभ्यासक्रमातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध सुविधांसाठी अर्ज करता येणार आहेत.

शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार असल्याने अर्ज भरताना आधार क्रमांकासह मोबाईल क्रमांक, ई-मेल व बँक खात्याची अचूक माहिती नोंदविणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी महाडीबीटी २.० प्रणालीवर नवीन नोंदणी करून Maha ID तयार करावी. यासाठी पूर्वीच्या महाडीबीटी पोर्टलवरील युजर आयडी व पासवर्डची आवश्यकता राहणार नाही.

नवीन तसेच नूतनीकरण अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे आदी आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन सादर करावीत. अर्ज सबमिट करण्यापूर्वी नोंदविलेली माहिती काळजीपूर्वक तपासून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून प्राप्त अर्जांची छाननी व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून अर्ज पुढील कार्यवाहीसाठी ऑनलाइन सादर करावेत. विद्यार्थ्यांकडून अर्जाच्या प्रक्रियेसाठी अनावश्यक शुल्क आकारू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

महाडीबीटी २.० पोर्टलवर अर्ज भरताना तांत्रिक अडचण उद्भवल्यास 022-49150800/18001025344 अथवा [email protected] या हेल्पडेस्कशी संपर्क साधवा .तसेच शिष्यवृत्तीचा लाभ पात्र विद्यार्थ्यांना वेळेत मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी व संबंधित महाविद्यालयांनी विहित कालावधीत आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात सहायक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर यांनी यांनी केले आहे.

0000

अश्विनी पुजारी/विसंअ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed