• Wed. Aug 19th, 2026

‘महा-साधना सप्ताहा’त नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 19, 2026

  • रणजितसिंह राजपूत यांना ‘AI दक्ष’ व ‘कर्मयोगी उत्कर्ष’; दिनेश चौरे, विकास नाठे यांना ‘AI दक्ष’ बॅज

 नंदुरबार, दिनांक १९ ऑगस्ट, २०२६ (जिमाका वृत्त) : शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या क्षमता विकासासाठी राबविण्यात आलेल्या ‘महा-साधना सप्ताह-2026’ मध्ये नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत आपला ठसा उमटविला आहे. या उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणारे जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत, वरिष्ठ लिपिक दिनेश चौरे आणि वाहनचालक विकास नाठे यांना माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह आणि संचालक (प्रशासन) किशोर गांगुर्डे यांच्या स्वाक्षरीची कौतुकास्पद कामगिरीची प्रमाणपत्रे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी देशाच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात प्रदान करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक आश्विनी सानप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. भारत सरकारचा क्षमता विकास आयोग (CBC) आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ते 10 एप्रिल 2026 या कालावधीत ‘महा-साधना सप्ताह’ आयोजित करण्यात आला होता. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये सातत्यपूर्ण अध्ययनाची संस्कृती रुजविणे, बदलत्या प्रशासकीय गरजांनुसार ज्ञान व कौशल्ये अद्ययावत करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढविणे आणि नागरिकाभिमुख प्रशासन अधिक सक्षम करणे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

विभागीय माहिती उपसंचालक डॉ. किरण मोघे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षण उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. नियमित कार्यालयीन जबाबदाऱ्या सांभाळतानाच विविध प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी क्षमता विकास आणि कौशल्यवृद्धीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांनी एकूण 112 तासांचे प्रशिक्षण पूर्ण करून एक ‘AI दक्ष’ बॅज आणि एक ‘कर्मयोगी उत्कर्ष’ बॅज प्राप्त केला. आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रशासकीय क्षमता विकासाशी संबंधित प्रशिक्षणात सातत्यपूर्ण सहभागातून त्यांनी ही कामगिरी नोंदविली.

वरिष्ठ लिपिक दिनेश चौरे यांनी एकूण 37 तासांचे प्रशिक्षण पूर्ण करून एक ‘AI दक्ष’ बॅज, तर वाहनचालक विकास नाठे यांनी एकूण 31 तासांचे प्रशिक्षण पूर्ण करून एक ‘AI दक्ष’ बॅज प्राप्त केला. अधिकारी ते कर्मचारी अशा विविध संवर्गातील सदस्यांनी प्रशिक्षणात उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाची सांघिक कामगिरी विशेष ठरली आहे. या तिन्ही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मिळून एकूण 180 तासांचे प्रशिक्षण पूर्ण केले असून, त्यांच्या नावावर तीन ‘AI दक्ष’ बॅज आणि एक ‘कर्मयोगी उत्कर्ष’ बॅज अशी उल्लेखनीय कामगिरी नोंदली गेली आहे. नियमित शासकीय कामकाजासोबत नवे ज्ञान आत्मसात करणे, कौशल्यवृद्धी करणे आणि तंत्रज्ञानाशी सुसंगत कार्यपद्धती विकसित करण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फलित आहे.

आजच्या डिजिटल युगात माहिती व जनसंपर्क क्षेत्राचे स्वरूप वेगाने बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल माध्यमे, समाजमाध्यमे आणि आधुनिक संवाद तंत्रज्ञानाचा शासकीय जनसंवादात परिणामकारक वापर करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सातत्याने अद्ययावत राहणे आवश्यक आहे. ‘महा-साधना सप्ताह’सारख्या उपक्रमांमुळे प्रशासनात सातत्यपूर्ण अध्ययन, कौशल्यवृद्धी आणि तंत्रज्ञानस्नेही कार्यसंस्कृती अधिक दृढ होत आहे. ‘महा-साधना सप्ताह-2026’मध्ये नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नोंदविलेली ही सांघिक कामगिरी कार्यालयासाठी अभिमानास्पद ठरली असून, ज्ञानाधिष्ठित, तंत्रज्ञानस्नेही आणि अधिक प्रभावी शासकीय जनसंवादाच्या दिशेने कार्यालयाने आपला ठसा उमटविला आहे.

0000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed