• Wed. Aug 19th, 2026

तृतीयपंथीयांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘बीज भांडवल योजना’ – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 19, 2026

मुंबई, दि. १९ : तृतीयपंथीय घटकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘बीज भांडवल योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देतानाच कौशल्य विकास, उद्योजकता आणि शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे.

या योजनेंतर्गत तृतीयपंथीयांना लघु उद्योग व सूक्ष्म व्यवसाय सुरू करण्यासाठी बीज भांडवल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकासास चालना देण्याचा शासनाचा उद्देश आहे. योजनेत लघु कर्जासाठी २५ हजार रुपये, मध्यम कर्जासाठी ५० हजार रुपये आणि दीर्घ कर्जासाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे. यामध्ये लाभार्थी हिस्सा ५ टक्के, शासन अनुदान ४५ टक्के आणि राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्ज ५० टक्के राहणार आहे. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याजावर ३ टक्के सवलत देण्यात येणार आहे.

विविध स्वयंरोजगार व्यवसायांना प्राधान्य

योजनेतून भाजी स्टॉल, चहा व स्नॅक्स सेंटर, झेरॉक्स व लॅमिनेशन सेंटर, फूड स्टॉल, पिठाची गिरणी, कपड्यांच्या पिशव्या तयार करणे, जनरल स्टोअर्स, स्टेशनरी शॉप, मिनी मालवाहतूक टेम्पो, आईस्क्रीम फॅक्टरी, वडा-पाव/ज्यूस सेंटर, बेकरी व्यवसाय, बांगडी दुकान, बटाटा वेफर्स बनविणे, ब्युटी पार्लर, सलून, चिकन/मासे विक्री केंद्र, मोबाईल शॉपी, मसाला तयार करणे तसेच लॉन्ड्री/धोबी व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

प्रशिक्षित लाभार्थ्यांसाठी प्लंबर, इलेक्ट्रिशियन तसेच फ्रिज, टीव्ही, मोबाईल, ए.सी., गॅस शेगडी, वॉटर फिल्टर व गिझर आदी उपकरणांची दुरुस्ती यांसारख्या व्यवसायांनाही कर्जाची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

१८ ते ५० वर्षे वयोगटातील तृतीयपंथीय पात्र

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा किमान १० वर्षांचा रहिवासी असणे आवश्यक आहे. सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेले तृतीयपंथीय ओळखपत्र असणे, वय १८ ते ५० वर्षे असणे तसेच संबंधित व्यवसाय करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. यापूर्वी अन्य बीज भांडवल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराकडे व्यवसायाचे कौशल्य असल्यास त्याचा उल्लेख अर्जात करणे आवश्यक आहे. या योजनेसाठी जामीनदार किंवा तारणाची आवश्यकता नाही.

आवश्यक कागदपत्रे

अर्जासोबत महाराष्ट्रातील १० वर्षांच्या वास्तव्याचा अधिवास प्रमाणपत्र, तृतीयपंथीय ओळखपत्र, आधार कार्ड/मतदार ओळखपत्र/पॅन कार्ड/रेशन कार्ड/लाईट बिल यापैकी आवश्यक कागदपत्र, व्यवसायाच्या जागेचा पुरावा, यंत्रसामग्री किंवा साहित्याचे कोटेशन, लागू असल्यास भाडेकरार, जागामालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो सादर करणे आवश्यक आहे.

संबंधित जिल्ह्याच्या समाजकल्याण कार्यालयात अर्ज सादर करावा

इच्छुक तृतीयपंथीयांनी शासनाने विहित केलेल्या नमुन्यातील अर्ज https://tinyurl.com/22wpc5j2 या लिंकवर जावून डाऊनलोड करून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयात अर्ज सादर करावा, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

0000

अश्विनी पुजारी/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed