• Sun. Aug 16th, 2026

चंद्रपूरच्या पोलिसांचा नागरिकांना दिलासा; चोरी गेलेला ऐवज नागरिकांना सुपूर्द – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 16, 2026

चंद्रपूर, दि. १६ : एकदा चोरी गेलेली वस्तू परत मिळेल की नाही, याबाबत नागरिकांच्या मनात साशंकता असते. आपली वस्तू कायमचीच गेली, असाच नागरिकांचा दृढ विश्वास असतो, मात्र याला छेद देत, चोरी गेलेल्या वस्तू तत्परतेने शोधून काढून चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनाने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. एकाच दिवशी तब्बल 3 कोटी 75 लक्ष रुपयाचा मुद्देमाल नागरिकांना परत करून चंद्रपूर पोलिसांनी एक आदर्श घडविला आहे.

 

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून, जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने मुद्देमाल हस्तांतरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक वुईके, चंद्रपूर शहराच्या महापौर संगीता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार,  सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी वसूमना पंत, जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आदी उपस्थित होते.

विविध घटनांमध्ये चोरी गेलेला तब्बल 3 कोटी 75 लक्ष रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी संबंधित मालकास परत केला. यात 73 लक्ष रुपयाचे 491 मोबाईल, 245 नागरिकांचे 7 लाख रुपये थेट बँक खाते जमा, दोन ट्रक, मोटर वाहने, दागिने आदींचा समावेश होता. यावेळी बोलताना पालकमंत्री अशोक वुईके म्हणाले, चोरी गेलेला मुद्देमाल संबंधित नागरिकास सन्मानाने परत मिळाला, हा पोलीस प्रशासनावरचा विश्वास दर्शवितो. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच पोलिसांनी नागरिकांना आपल्या उत्कृष्ट कार्यातून दिलासा दिला आहे. जिल्ह्यातील पोलीस प्रशासन अतिशय चांगले काम करत आहे.

चोरी गेलेल्या मुद्देमालाबाबत अनेक कुटुंबांच्या मनात शंकाकुशंका राहतात. अशा कुटुंबांना दिलासा देण्यासाठी पोलिसांच्या विश्वासाची गरज आहे. चोरट्यांकडून मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी गुन्हेगारांना स्पष्ट संदेश दिला आहे. गुन्हा हा काही काळ लपविला जाऊ शकतो, मात्र कायद्यानुसार पूर्णवेळ त्यावर पांघरून घालता येत नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी लोकांनी यांनी जिल्ह्याला चांगली ओळख निर्माण करून दिली. भविष्यात आणखी चांगले काम करा, असे आवाहन त्यांनी केले.

मुद्देमाल परत मिळालेले लाभार्थी 

विनोद खांडरे, अनिल बांगडे, अजय दासलवार, सुधीर जयपुरकर, मनोज वैरागडे यांना मोटर वाहने परत मिळाली. सुभाष बारधमवार, राजवीर सिंग धनवाल, रंजना कुडकेलवार, मोहम्मद खान यांना सोन्या-चांदीचे दागिने, गिरीश साठनिया, एडवोकेट मुरलीधर अवघडे, आलेबाला संदीप, अजय यादव यांना नगदी रक्कम तर सिंधू बिरेवाल, इना निषाद, निलेश वरभे यांना मोबाईल परत मिळाले.

पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांचा सन्मान

यावेळी पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके आणि प्रदीप पुल्लरवार यांचा तसेच अनिल आत्राम, वीरेंद्र यादव या पोलीस कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पोलीस विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सुरक्षा मंत्र या पुस्तकाचे  मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी केले. संचालन मंगला आसुटकर यांनी तर आभार अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी मानले.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed