बीड, दि. १५ (जिमाका) :- शिक्षणासह आरोग्याला प्राधान्य देत सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड घडविण्याचा आपला संकल्प आहे. यासाठी सर्व बीडकरांनी साथ द्यावी, असे आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या स्वातंत्र्य दिन संदेशात केले. बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात त्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा झाला. यावेळी या कार्यक्रमास जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी दिव्यांक गुप्ता आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यावेळी आमदार विजयसिंह पंडित, नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांचीही विशेष उपस्थिती होती. यावेळी केलेल्या संबोधनात उपमुख्यमंत्री महोदया म्हणल्या की, राज्याची उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून आज मला अत्यंत अभिमानाने सांगता येत आहे की, आपला बीड जिल्हा आता विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे.
आज भारत जगातला सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रांपैकी एक म्हणून अभिमानाने उभा आहे. शेतीपासून अंतराळापर्यंत, शिक्षणापासून तंत्रज्ञानापर्यंत आणि उद्योगापासून डिजिटल क्रांतीपर्यंत मोठी झेप घेतली आहे असे उपमुख्यमंत्री म्हणाल्या. आपल्या भाषणात त्यांनी प्रारंभी देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणारे स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या त्यागाचे स्मरण करत मराठवाडा मुक्ती संग्रामातही योगदान देणाऱ्या सर्व मुक्तीसैनिकांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. स्वातंत्र्यानंतर ते अबाधित राखण्यासाठी सैन्यदल, निमलष्करी दल आणि पोलीस दल तसेच ज्यांनी प्राणांचे बलिदान दिलं, त्या सर्वांना मी अभिवादन करते असे त्या म्हणाल्या. जिल्ह्यातील सुपुत्रांनी कर्तुत्वाच्या जोरावर ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलं आहे, त्या सर्वांचे अभिनंदन करून त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
आपल्या जिल्ह्याच्या विकासाचा कणा असलेल्या बळीराजाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’ अंतर्गत बीड जिल्ह्यातल्या 96 हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 711 कोटी रुपये जमा करून त्यांचा सातबारा कोरा करण्यात आला आहे. पुढील टप्प्यात आणखी शेतकऱ्यांचे सातबारे कोरे होणार आहेत. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं तातडीनं ॲग्री स्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण करून घ्यावं, असे आवाहन उपमुख्यमंत्री महोदया यांनी आपल्या भाषणात केले. त्या पुढे म्हणाल्या की, बीड जिल्ह्यात 2025-26 मध्ये अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळं बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने 1 हजार 459 कोटींचं अनुदान मंजूर करण्यात आलं आहे. आतापर्यंत 9 लाख 22 हजार 362 बाधित शेतकऱ्यांना 634 कोटींचं अनुदान डीबीटीद्वारे वितरित करण्यात आलं आहे.
येत्या काळात माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान राज्यात जलसंधारण सप्ताह राबविला जाणार आहे. या माध्यमातून बीड जिल्ह्याला अधिक समृद्ध, हरित आणि पाणीदार बनवण्याचा संकल्प आपण करूया असे त्या म्हणाल्या. जिल्ह्यात सुरु असणाऱ्या ‘आष्टी उपसा सिंचन’ या महत्त्वाकांक्षी योजनेमुळं आष्टी तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडणार आहे. आदरणीय अजितदादांनी या योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देत, या प्रकल्पाला गती दिली असे सांगून श्रीमती पवार म्हणाल्या की, या उपसा सिंचन योजनेमुळं 1.68 टीएमसी पाणी उपलब्ध होत असून, आष्टी तालुक्यातल्या 26 गावांतील 8 हजार 147 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. ‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन’अंतर्गत 2025-26 मध्ये जिल्ह्यात जवळपास 14 हजार 765 कामं हाती घेण्यात आली. यातून जवळपास दीड कोटी मनुष्यदिवस रोजगार निर्माण झाला आहे, याचा उल्लेख त्यांनी केला.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी यावर्षी 623 कोटी रुपयांचा जिल्हा नियोजन निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून जिल्ह्याच्या गरजेनुसार प्राधान्यानं विकासकामं करण्यात येणार आहेत असे श्रीमती पवार यांनी यावेळी सांगितले. ‘महाराष्ट्र राज्य सेवा हक्क कायद्याच्या’ अंमलबजावणीत बीड जिल्ह्यानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 2025-26 मध्ये आलेल्या सुमारे 6 लाख 88 हजार अर्जांपैकी 99 टक्क्यांहून अधिक अर्ज वेळेत निकाली काढले आहेत. या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा सरकारतर्फे विशेष सत्कार करण्यात आला आहे. याबद्दल प्रशासनाचे मनापासून अभिनंदन व कौतूक त्यांनी भाषणात केले. जिल्हा रुग्णालयात अद्ययावत 10 खाटांचा हृदयविकार विभाग, महिलांसाठी 100 खाटांचं माता-बाल संगोपन केंद्र उभारलं आहे. मागच्या दौऱ्यात मी स्वत: त्याठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली होती असे सांगून त्या म्हणाल्या की, आजच आपल्या वडवणी तालुक्यातल्या चिंचवण गावात नवीन ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचं लोकार्पण होत आहे. ही आनंदाची आणि समाधानाची बाब आहे.
ऊसतोड कामगारांच्या आरोग्यासाठी ‘मिशन साथी’ राबवलं जात आहे. आयुष्मान भारत आणि महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड देण्यात आलं आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी बीड शहरात उभारण्यात आलेलं ‘संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वसतिगृह’ हे महाराष्ट्रातलं ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीचं पहिलं वसतिगृह ठरलं आहे. ही अभिमानाची बाब आहे. कालच त्याच लोकार्पण केलं आहे, असेही श्रीमती पवार यांनी यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी सागितले की, बीड-पुणे रेल्वे प्रकल्प हा जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. येणाऱ्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापर्यंत ही रेल्वे पुण्यातल्या हडपसरपर्यंत नेण्याच्या दृष्टीनं आमचे प्रयत्न सुरु आहेत. सोबतच टाटा टेक्नॉलॉजीज आणि MIDC यांच्या संयुक्त विद्यमानं उभारण्यात आलेलं 196 कोटी रुपयांचं कौशल्य संवर्धन केंद्र (CIIIT) कौशल्यवर्धन केंद्र पूर्णत्वास येत आहे आणि परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 301 कोटी रुपयांच्या सुधारित विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या विकास प्रकल्पाचं काम लवकरच सुरु करत आहोत. मागील दौऱ्यात माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुढील अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
परळीत 41 हेक्टर क्षेत्रावर 565 कोटी रुपये खर्चून पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारलं जाणार आहे. थोड्या वेळानं या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं भूमिपूजन आज होत आहे. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे कॉलेज महत्त्वाची भूमीका बजावेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ऑलिम्पिक पदकविजेते स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा यंदा आपण बीड जिल्ह्यात घेणार आहोत. बीडच्या क्रीडा संकुलाच्या विकासासाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशीही माहिती उपमुख्यमंत्री यांनी दिली.
बीडला प्रत्येक क्षेत्रात नव्या उंचीवर नेऊन समृद्ध, सक्षम आणि सुरक्षित… बीड घडवण्याचा आपला संकल्प आहे. पाटोदा तालुक्यातल्या जरेवाडी जिल्हा परिषदेची शाळा ही गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं उत्तम उदाहरण आहे. आदरणीय अजितदादांनी सुध्दा जरेवाडीच्या आदर्श शाळेचं कौतुक केलं होतं… याच धर्तीवर बीडमधील शैक्षणिक प्रवाह अधिक गतिमान करू असे त्या म्हणाल्या. यावेळी भाषणानंतर त्यांनी स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देताना प्रत्येकाशी वैयक्तिक संवाद साधला. सोबतच नागरिकांना भेटून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमानंतर येथे सुरु करण्यात आलेला उपमुख्यमंत्री सहायता कक्ष व मुख्यमंत्री धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष यांच्या तर्फे आयोजित रक्तदान शिबीराचे उद्घाटन केले. जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा रूग्णालयातर्फे हे शिबीर घेण्यात आले.
*-*-*-*-