• Fri. Aug 14th, 2026

Maharashtra Rain : शेतामध्ये पाणी साचणार इतका पाऊस पडणार, पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार,पुढच्या तीन ते चार दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये विखुरलेल्या स्वरुपाची पावसाची शक्यता आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : महाराष्ट्रात सध्या पावसाने उसंत घेतली आहे. फार क्वचित ठिकाणी पाऊस हजेरी लावत आहे. हवामानाची ही स्थिती आणखी किती दिवस असेल आणि राज्यात पाऊस पुन्हा कधी सुरु होईल? याबाबत हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात आता पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढच्या तीन दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वदूर पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता आहे. “जिथे आभाळ तांबडे होईल त्या भागात पुढच्या 72 तासांत पाऊस येईल. हा अंदाज निसर्ग सांगतो”, असं पंजाबराव डख म्हणाले आहेत.

“राज्यात आजपासून ते 17 ऑगस्टपर्यंत विदर्भात चांगला पाऊस पडणार आहे. राज्यात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, जळगाव, नंदुरबार, मालेगाव, नाशिक या भागांमध्ये पावसाची दाट शक्यता आहे. एक कमी दाबाचे क्षेत्र या भागांमधून जाणार आहे. दोन कमी दाबाचे क्षेत्र या जिल्ह्यांवरुन जाणार आहे. एक क्षेत्र मध्य प्रदेशच्या दिशेला तर दुसरे गुजरातमार्गे पुढे राजस्थानच्या दिशेला जाणार आहे. त्यामुळे राज्याच्या सीमालगत भागात पाऊस पडणार आहे”, अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.

कुठे जास्त तर कुठे कमी पावसाची शक्यता

“मराठवाड्यातदेखील 17 ऑगस्टपर्यंत भाग बदलत विखुरलेल्या स्वरुपात पाऊस पडणार आहे. पण मुसळधार पाऊस पडणार नाही. पश्चिम महाराष्ट्रातही विखुरलेला पाऊस पडणार आहे. कोल्हापूर पासून पुढे कोकण किनारपट्टीवर पालघरपर्यंत चांगल्या पावसाची शक्यता आहे. या भागांमध्ये 18 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे”, अशी माहिती डख यांनी दिली.

17 ऑगस्टपर्यंत कुठे-कुठे पाऊस पडणार?

“सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, सांगली या परिसरात पुढच्या तीन दिवसांत पाऊस पडणार आहे. दहा मिनिटे, अर्धा तास ते एक तासाचा पाऊस पडू शकतो. पुणे, मुंबई, इगतपुरी, संगमनेर, अकोले, नाशिक, दिंडोरी या परिसरात 17 ऑगस्टपर्यंत पाऊस पडू शकतो. सर्वाधिक पाऊस विदर्भात होण्याची शक्यता आहे”, असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

शेतात पाणी साचेल इतक्या पावसाची शक्यता

“भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, मोर्शी, अचलपूर, दर्यापूर, परतवाडा, अकोट, अकोला, शेगाव, खामगाव, जळगाव जामोद, मलकापूर, नांदुरा, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार या पट्ट्यात मोठा पाऊस पडणार आहे. शेतात पाणी साचेल इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे”, असं पंजाबराव डख यांनी सांगितलं.

राज्यात मोठा पाऊस कधी येणार?

“ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मोठा पाऊस येणार आहे. एक कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. विदर्भात सर्वाधिक पावसाची शक्यता आहे. यानंतर राज्याच परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे. सोलापूर, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, सातारा, मान-खटाव या भागांमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे”, असा दावा पंजाबराव डख यांनी केला आहे.