• Fri. Aug 14th, 2026

    चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी 16 ऑगस्टला बैठक – उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 13, 2026

    मुंबई, दि. १३: चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरवस्थेसह उद्योजकांच्या विविध अडचणी जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता चाकण येथे उद्योजक व औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध माध्यमांमधून वृत्त प्रसिद्ध होत आहे. रस्त्यांच्या समस्येमुळे काही कंपन्या महाराष्ट्राबाहेर अथवा राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, त्याचा रोजगारावर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनी आज चाकणमधील औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

    उद्योजकांच्या समस्या केवळ चर्चेपुरत्या मर्यादित न ठेवता त्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर ठोस मार्ग काढण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत रस्ते, वाहतूक तसेच अन्य पायाभूत सुविधांबाबतच्या अडचणींची प्रत्यक्ष माहिती घेण्यात येणार असून, संबंधित विभागांच्या समन्वयातून आवश्यक उपाययोजना करण्याबाबत कार्यवाही केली जाईल. चाकण हे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील महत्त्वाचे केंद्र असून, या परिसरातील उद्योगांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे तसेच उद्योजकांच्या अडचणी दूर करणे याला शासनाचे प्राधान्य आहे. उद्योग महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित होण्याची परिस्थिती निर्माण होऊ नये, विद्यमान उद्योगांचे संरक्षण व्हावे आणि चाकण परिसरातील रोजगाराच्या संधी कायम राहाव्यात, यासाठी शासन आणि औद्योगिक क्षेत्र यांच्यात समन्वयातून मार्ग काढला जाईल, असे उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनी स्पष्ट केले.

    चाकणच्या औद्योगिक विकासाला अधिक गती देतानाच उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. संबंधित सर्व घटकांशी संवाद साधून आवश्यक त्या उपाययोजना व ठोस निर्णय घेण्यात येतील, असेही उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले. चाकणमधील औद्योगिक संघटनांनीही उद्योगमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत सकारात्मक चर्चा करून समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली आहे.

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed