मुंबई, दि. १२ : येत्या २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात “जलसंधारण दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, मुंबईतील राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रमासह सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी एकाच वेळी ‘महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’ चे आयोजन करण्यात आले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते या स्पर्धेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या दोन्ही उपक्रमांमध्ये राज्यातील युवक-युवती आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे, अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली.
मंत्री संजय राठोड यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या जलसंधारण क्षेत्राला दूरदृष्टी आणि व्यापक दिशा देणारे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट हा दिवस ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्यात येत असून, त्यांच्या जलसंधारणविषयक योगदानाचे स्मरण करत राज्यभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यावर्षीच्या जलसंधारण दिनाचा मुख्य संदेश “माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा” असा आहे.
१५ ऑगस्टपासून ‘जलसंधारण सप्ताह’
१५ ऑगस्टपासून राज्यात ‘जलसंधारण सप्ताह’ सुरू होणार असून, २१ ऑगस्टपर्यंत शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मृद व जलसंधारण, पाणी बचत, भूजल पुनर्भरण, पावसाच्या पाण्याचे संकलन तसेच नदी-ओढ्यांच्या स्वच्छतेसंदर्भात विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
जलसंधारण सप्ताहानंतरही या उपक्रमांमध्ये सातत्य राखत ‘जलसंधारण अभियान’ म्हणून २६ जानेवारी २०२७ पर्यंत जिल्हास्तरावर विविध जनजागृती व लोकसहभागाचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या माध्यमातून मृद व जलसंधारणाचा संदेश दीर्घकाळ जनमानसात रुजवून जलसंधारणाला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
२१ ऑगस्टला संपूर्ण राज्यात ‘महा वॉकेथॉन’
२१ ऑगस्ट रोजी सकाळी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी एकाच वेळी ३ कि.मी. स्पर्धात्मक ‘महा वॉकेथॉन’ आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान १० हजार नागरिकांच्या सहभागाचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, राज्यभरातून ३ लाखांपेक्षा अधिक नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग अपेक्षित आहे.
या उपक्रमासाठी क्यूआर कोडद्वारे ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, पात्र सहभागींना ई-प्रमाणपत्र देण्यात येईल. सहभागी नागरिकांना मृद व जलसंधारणाच्या कार्याशी सातत्याने जोडण्यासाठी ‘जलदूत’ ही ओळख देण्याची संकल्पनाही या अभियानाचा भाग आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व सहभागी नागरिक सामूहिक मृद व जलसंधारण शपथ घेतील. पाण्याचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचविणे, माती व पाण्याच्या संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि मृद व जलसंधारणाच्या कार्यात व्यापक लोकसहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
जलसंधारण मंत्री संजय राठोड म्हणाले, “हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर माती आणि पाण्याचे संवर्धन ही काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व ओळखून या महा वॉकेथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि मृद व जलसंधारणाचा संदेश घराघरात पोहोचवावा.”
विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे
महा वॉकेथॉनमध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकासाठी ₹२५ हजार व गौरवचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी ₹१५ हजार व गौरवचिन्ह आणि तृतीय क्रमांकासाठी ₹११ हजार व गौरवचिन्ह अशी प्रोत्साहनपर बक्षिसे प्रस्तावित आहेत.
तसेच सहभागी नागरिकांसाठी भाग्यवान सोडतीच्या माध्यमातून विशेष प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचे नियोजन आहे. प्रायोजक अथवा सामाजिक उत्तरदायित्व निधीतून सहभाग उपलब्ध झाल्यास आणखी आकर्षक प्रोत्साहनपर बक्षिसांचा समावेश करता येणार आहे.
युवकांसाठी ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर चॅलेंज’
जलसंधारण दिनाच्या अभियानाला डिजिटल माध्यमातून व्यापक लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर चॅलेंज’ हा विशेष उपक्रमही राबविण्यात येणार आहे. राज्यातील १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींसाठी ही जिल्हास्तरीय स्पर्धा असेल. सहभागी युवक-युवतींना मृद व जलसंधारणाचा संदेश देणारी ३० ते ६० सेकंदांची इन्स्टाग्राम रील तयार करता येईल.
संपूर्ण राज्यासाठी एकच अधिकृत हॅशटॅग #SaveSoilSaveWater वापरण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यातून किमान २५० रील्स आणि राज्यभरातून १० हजार रील्सचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून लाखो नागरिकांपर्यंत डिजिटल स्वरूपात मृद व जलसंधारणाचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. रील स्पर्धेत प्रत्येक जिल्ह्यात प्रथम पुरस्कार ₹२५ हजार व गौरवचिन्ह, द्वितीय पुरस्कार ₹१५ हजार व गौरवचिन्ह आणि तृतीय पुरस्कार ₹१० हजार व गौरवचिन्ह प्रस्तावित आहे. पात्र सहभागींना ई-प्रमाणपत्र तसेच विजेत्यांना विशेष “युवा मृद-जलदूत” म्हणून गौरविण्यात येणार आहे.
शासनाची जलसंधारण कामगिरीही जनतेसमोर
जलसंधारण सप्ताह आणि महा वॉकेथॉनच्या माध्यमातून शासनाच्या विविध मृद व जलसंधारण योजनांची माहितीही जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. यामध्ये जलयुक्त शिवार अभियान २.०, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, अमृत सरोवर, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक २.० यासह विविध मृद व जलसंधारण कामे, यशस्वी प्रकल्प आणि लाभार्थी यशोगाथांचा समावेश असेल.
कोण कोण सहभागी होणार?
या राज्यव्यापी उपक्रमात लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, युवक-युवती, महिला, शासकीय अधिकारी-कर्मचारी, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), माय भारत, क्रीडा संस्था, सामाजिक व स्वयंसेवी संस्था, उद्योग क्षेत्र, खेळाडू, कलाकार, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि सामान्य नागरिकांचा व्यापक सहभाग अपेक्षित आहे.
प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समन्वय करण्यात येणार आहे. मुंबईतील राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि कलाकारांचा सहभाग अपेक्षित आहे.
आपल्या पुढच्या पिढीसाठी माती आणि पाणी जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. महा वॉकेथॉनमध्ये सहभागी व्हा, रील स्पर्धेत सहभागी व्हा आणि मृद व जलसंधारणाचा संदेश महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवा. एक पाऊल जलसंधारणासाठी टाकूया आणि लाखो पाऊले सुरक्षित भविष्यासाठी एकत्र चालूया, असे आवाहन मंत्री संजय राठोड केले आहे.
0000
गजानन पाटील/विसंअ