मुंबई, दि. १२: काळ बदलला, माध्यमे बदलली आणि जनजागृतीची शैलीही बदलली. मोबाईलच्या पडद्यावरील काही सेकंदांची ‘रिल’ लाखो लोकांपर्यंत अधिक वेगाने व प्रभावीपणे पोहोचत आहे. या बदलत्या माध्यमविश्वाची ताकद ओळखून सार्वजनिक आरोग्य विभाग आणि ट्रेन्ड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया (टीएनएआय), महाराष्ट्र शाखेने एक अभिनव पाऊल उचलले आहे.
राज्यातील परिचर्या विद्यालये, महाविद्यालयात प्रशिक्षण घेत असलेल्या आणि सेवेत कार्यरत असलेल्या परिचारिकांसाठी ‘क्षयरोगमुक्त भारत’ या विषयावर रिल स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. तयार केलेल्या निवडक रील 14 ऑगस्ट 2026 पर्यंत [email protected] या संकेतस्थळावर पाठवाव्यात. या माध्यमातून आरोग्य जनजागृती आणि सोशल मीडिया यांचा संगम घडविणारा हा प्रयोग केवळ स्पर्धा नसून काळानुरूप बदलणाऱ्या आरोग्य संवादाचे नवे पर्व ठरू शकतो. विशेषतः तरुण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल माध्यमे सर्वाधिक प्रभावी ठरत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वैज्ञानिक आणि अचूक माहितीला रीलच्या सर्जनशील स्वरूपात मांडण्याचा हा प्रयोग महत्त्वपूर्ण राहणार आहे. रिल तयार करणारे केवळ डिजिटल कंटेंट क्रिएटर नसून रुग्णांच्या प्रत्यक्ष संपर्कात येणाऱ्या परिचारिका आणि परिचर्या विद्यार्थी हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे क्षयरोगाची लक्षणे, तपासणी, उपचार, पोषण किंवा उपचारातील सातत्य यासारखे विषय केवळ पुस्तकातील माहिती म्हणून नव्हे, तर प्रत्यक्ष आरोग्यसेवेतील अनुभवाच्या आधारे मांडले जाण्याची शक्यता आहे.
रिलमध्ये क्षयरोग हा केवळ वैद्यकीय उपचारांचा विषय नाही. त्याच्याशी सामाजिक गैरसमज, भीती आणि कलंकही जोडलेला आहे. त्यामुळे क्षयरोगाबाबत योग्य माहिती देण्याबरोबरच लक्षणे ओळखणे, वेळेवर तपासणी करणे, उपचार पूर्ण करणे, उपचारात खंड न पाडणे, योग्य पोषण घेणे आणि रुग्णांशी भेदभाव न करणे याबाबत जनजागृती करणे तितकेच आवश्यक आहे. रिलच्या माध्यमातून याच मुद्द्यांना सर्जनशील पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी या स्पर्धेमुळे मिळणार आहे. मराठी भाषेत तयार होणाऱ्या या रिल्समध्ये स्थानिक बोली भाषा, ग्रामीण जीवनशैली, छोट्या नाटिका, संवाद, भावनिक प्रसंग किंवा प्रत्यक्ष अनुभव अशा विविध माध्यमांचा वापर करावा. त्यामुळे आरोग्य संदेश ‘उपदेश’ न राहता लोकांच्या रोजच्या जीवनाशी जोडलेला संवाद बनू शकतो. ‘फिल्ड’वर काम करणाऱ्या नर्सेसचा अनुभव, तरुणाईची डिजिटल सर्जनशीलता आणि सोशल मीडियाची पोहोच’ असा त्रिवेणी संगम या उपक्रमातून साधला जाणार आहे.
क्षयरोगमुक्त महाराष्ट्र आणि क्षयरोगमुक्त भारताच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल असून याकडे केवळ ‘रिल स्पर्धा’ म्हणून न पाहता आरोग्य जनजागृतीच्या बदलत्या भाषेची ही सुरुवात आहे. नर्सिंग विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि सोशल मीडियाची ताकद एकत्र आली तर क्षयरोग निर्मूलनाचा संदेश घराघरात पोहोचविण्यासाठी ही ‘रिल’ नक्कीच ‘रिअल’ बदलाची सुरुवात ठरू शकते. जास्तीत जास्त विद्यार्थी परिचारिकांनी या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन उपसंचालक, आरोग्य सेवा (शुश्रुषा) डॉ. निलिमा सोनावणे यांनी केले आहे.
०००
धोंडीराम अर्जुन/विसंअ