पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून जाणाऱ्या या महामार्गांवर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर यांसह चाकण, तळेगाव, भोसरी आणि हिंजवडीतील औद्योगिक व आयटी क्षेत्राशी जोडणारी वाहतूक याच मार्गांवरून होते. त्यामुळे सकाळी कामावर जाण्याच्या आणि सायंकाळी काम सुटण्याच्या वेळेत वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढतो. या गर्दीत वेगमर्यादा ओलांडणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, अचानक लेन बदलणे, मोबाइलवर बोलत वाहन चालविणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालविणे यांसारख्या प्रकारांमुळे अपघातांची तीव्रता वाढत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना अवजड वाहनांचा धोका निर्माण होत आहे.
Pune News : दुचाकीवरुन पडल्याने हात फ्रॅक्चर, ऑपरेशनवेळी पुण्यात 28 वर्षीय विवाहितेचा मृत्यू, डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोपपुणे-नाशिक महामार्ग
सर्वाधिक धोकादायक
शहरातून जाणाऱ्या चारही महामार्गांमध्ये पुणे-नाशिक महामार्गावर सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. २०२४मध्ये या मार्गावर ५१, २०२५मध्ये ५३ आणि यंदा जूनअखेर २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गावरही यंदा जूनअखेर २० जणांचा बळी गेला आहे. जुना पुणे-मुंबई महामार्ग आणि मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील मृत्यूंची संख्याही चिंताजनक आहे. विशेष म्हणजे, यंदाचे वर्ष अद्याप निम्म्यावर असतानाच चारही महामार्गांवरील मृत्यूंचा आकडा ६६ वर पोहोचला आहे.
सकाळी, सायंकाळी घटना
औद्योगिक पट्ट्यांमध्ये सकाळी आणि सायंकाळी शिफ्ट बदलाच्या वेळी दुचाकी, चारचाकी आणि मालवाहू वाहनांची संख्या झपाट्याने वाढते. त्याचवेळी महामार्ग ओलांडणारे पादचारी आणि रस्त्याच्या कडेला थांबणारी वाहने यामुळे अपघाताचा धोका वाढतो.
Pune Crime: आई गावी गेलीय; आधी माऊलीला संपवलं, नंतर बॉडी तशीच ठेवून घराला कुलूप ठोकलं; अखेर फुटलं पुण्यातील घटनेचं बिंग!ब्लॅक स्पॉटवर तातडीने उपायांची गरज
महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी ‘ब्लॅक स्पॉट’चे शास्त्रीय पद्धतीने परीक्षण करून त्या ठिकाणी आवश्यक सुधारणा करणे गरजेचे आहे. प्रभावी प्रकाशयोजना, स्पष्ट दिशादर्शक फलक, लेन मार्किंग, वेग नियंत्रणासाठी आधुनिक यंत्रणा आणि नियमित वाहतूक तपासणी यावर भर देण्याची आवश्यकता आहे. औद्योगिक भागातील शिफ्टच्या वेळेनुसार वाहतूक नियोजन केल्यासही अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते.
महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी वेगमर्यादेची प्रभावी अंमलबजावणी, मद्यधुंद वाहन चालकांवर कठोर कारवाई आणि ‘ब्लॅक स्पॉट’चे नियमित परीक्षण केले जात आहे. त्यासोबतच वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यावरही भर आहे. मात्र, प्रशासन आणि पोलिसांच्या उपाययोजनांबरोबरच वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे, लेन शिस्त पाळणे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे.-विक्रांत देशमुख, पोलिस उपायुक्त (वाहतूक), पिंपरी-चिंचवड
अपघातांची प्रमुख कारणे…
-भरधाव वेग आणि वेगमर्यादेचे उल्लंघन
-अचानक लेन बदलणे; चुकीचे ओव्हरटेक
-मोबाइलवर बोलत वाहन चालविणे
-मद्यप्राशन करून वाहन चालविणे
-अवजड वाहनांची वाढलेली वर्दळ
-दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर टाळणे
-रात्री थकलेल्या अवस्थेत वाहन चालविणे
-पावसाळ्यात निसरडा रस्ता आणि कमी दृश्यमानता
