• Wed. Jul 29th, 2026

    आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. व्यंकट गिते यांची नियुक्ती   – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 29, 2026
    आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. व्यंकट गिते यांची नियुक्ती   – महासंवाद

    मुंबई, दि. २९ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक येथे अधिष्ठाता (डीन) पदावर कार्यरत असलेल्या डॉ. वेंकट शाहुबाई अर्जुनराव  गिते यांची नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी डॉ. वेंकट गिते यांची कुलगुरुपदावर नियुक्ती जाहीर केली. त्यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे.

    ले. ज. डॉ. माधुरी कानिटकर यांचा कुलगुरूपदाचा कार्यकाळ दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. संजीव सोनवणे यांच्याकडे विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता.

    डॉ. गिते यांनी २००१ मध्ये एम.एस. (शल्यचिकित्सा) आणि २०१० मध्ये डीएनबी (यूरोलॉजी) पदवी प्राप्त केली. त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सुपरस्पेशालिटी ब्लॉक, छत्रपती संभाजीनगर येथे यूरोलॉजी विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून काम केले आहे. त्याशिवाय ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक येथे अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत.

    शासकीय व्यवस्थेत कॅडव्हर किडनी प्रत्यारोपण कार्यक्रम सुरू करण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या अवयव प्रत्यारोपण कार्यक्रमाचे ते सल्लागार सदस्य आहेत.

    वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातही डॉ. गिते यांनी उल्लेखनीय कार्य केले असून, त्यांच्या नावावर ५३ संशोधन निबंध आणि ६ पुस्तके प्रकाशित आहेत. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी योग्य उमेदवाराची शिफारस करण्यासाठी राज्यपालांनी डॉ. सी. ई. ईपन, प्राध्यापक, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर यांच्या अध्यक्षतेखाली शोध समितीची स्थापना केली होती. या समितीमध्ये वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाचे सचिव धीरज कुमार आणि राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्थेचे संचालक डॉ. अनुपकुमार आर. अन्वीकर यांचा समावेश होता.

    समितीने शिफारस केलेल्या सर्व उमेदवारांच्या वैयक्तिक मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. वेंकट गिते यांच्या नावाची कुलगुरूपदी नियुक्ती जाहीर केली.

    0000

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed