• Wed. Jul 29th, 2026

    धुळे शहरातील वीजप्रश्न प्राधान्याने सोडवावे – राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 29, 2026
    धुळे शहरातील वीजप्रश्न प्राधान्याने सोडवावे – राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर – महासंवाद

    मुंबई, दि. २९ : धुळे शहरातील वीजपुरवठा व नवीन विद्युत जोडणीसंदर्भातील प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली धुळे येथील या महत्वाच्या प्रश्नांवर मुंबईतील निर्मल भवन येथील एमएसआरडीसी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत धुळे शहरातील वीजपुरवठा, नवीन विद्युत जोडणी, एचटी/एलटी स्थलांतरण, पाणीपुरवठा केंद्रे, औद्योगिक जोडण्या तसेच महावितरणच्या कार्यालयीन इमारतीसंदर्भात सविस्तर सादरीकरण करण्यात आले. अमृत अभियान अंतर्गत भुयारी गटार योजनेतील महादेव मंदिर परिसरातील ४० दलली क्षमतेच्या मलशुद्धीकरण केंद्रासाठी आवश्यक विद्युत जोडणीचे काम गतीने पूर्ण करावे, जेणेकरून हा महत्त्वाचा स्वच्छता प्रकल्प विनाविलंब कार्यान्वित होईल, असे निर्देश राज्यमंत्री साकोरे- बोर्डीकर यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

    धुळे शहरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी उपलब्ध ४,००० चौ.मी. जागेवर संयुक्त व एकात्मिक महावितरण कार्यालय उभारण्याबाबतही या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. देवपूर भागातील रोहित्र क्षमतावाढ, नवीन रोहित्रे बसविणे व पाणीपुरवठा केंद्रांना अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश राज्यमंत्री साकोरे- बोर्डीकर यांनी यावेळी महावितरणला दिले. मुख्य आग्रा रोड तसेच विविध मार्गांवरील वीजतारा व रोहित्रे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून रस्ते सुशोभीकरणाचे काम प्राधान्याने सुनिश्चित करावे. त्याचप्रमाणे प्रलंबित औद्योगिक वीजजोडण्याचे काम विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश राज्यमंत्री साकोरे- बोर्डीकर यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

    महावितरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि धुळे महानगरपालिका यांनी आपआपसात योग्य समन्वय राखून सर्व प्रलंबित प्रस्तावांवर कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी. नागरिकांच्या गैरसोयी दूर करण्यासाठी तसेच पाणीपुरवठा व स्वच्छतेसारख्या मूलभूत सेवा विनाअडथळा सुरू राहाव्यात, यासाठी संबंधित विभागांनी प्राधान्याने काम करावे, असे निर्देशही राज्यमंत्री  बोर्डीकर यांनी यावेळी दिले.

    बैठकीस ऊर्जा विभागाचे सहसचिव सूर्यकांत निकम, मुख्य अभियंता (ट्रान्स, मुंबई) श्रीमती शिल्पा कुंभार, एमएमसीचे मुख्य अभियंता प्रवीण प्रतापसिंग परदेशी, अधीक्षक अभियंता  (महावितरण, कॉर्पोरेट कार्यालय) नितीन काळे, जळगाव येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता धनंजय गोंडगे, भुसावळ येथील अधीक्षक अभियंता गणेश देशमुख, धुळे येथील अति. कार्यकारी अभियंता गिरीश मोहिते, अति. कार्यकारी अभियंता (एलएमएसडी, धुळे) संजय चव्हाण यांच्यासह धुळे महानगरपालिकेचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    0000

    प्राजक्त ओढे/29.7.2026

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed