Mumbai Heavy Rains: गेल्या दोन ते तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम उपनरगासह शहरातील काही भागातून गढूळ पाण्याच्या तक्रारी आल्यानंतर महापालिकेने मुंबईकरांना काही दिवस पाणी गाळून व उकळून पिण्याचं आवाहन केलं आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या पाणलोट क्षेत्रात मागील तीन ते चार दिवसांमध्ये सातत्या जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून नदीपात्रात गढूळ पाणी आले आहे. परिणामी, मुंबईतील पश्चिम उपनगरे व शहर विभागातील काही भागांत गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. गढूळपणा कमी करण्यासाठी महापालिका जल अभियंता विभागामार्फत जलशुद्धीकरण केंद्रामध्ये योग्य त्या उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. पाणी निर्जंतुकीकरणासाठी क्लोरीनचा पुरेसा वापर केला जात आहे.
BEST Bus Accident: मानखुर्द अपघातानंतर भयानक वास्तव समोर; रुग्णवाहिकांचा प्रतिसाद नाही, पोलिस गाडीतून जखमींना रुग्णालयात नेण्याची वेळ
मुंबईला पिण्याचे पाणी आसपासच्या जिल्ह्यांमध्ये असलेल्या जलाशयांच्या जाळ्यामधून मिळते. मुसळधार पावसाच्या काळात, जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात वाढलेल्या प्रवाहामुळे पाण्याची गढूळता वाढू शकते, ज्यामुळे मुंबईकरांना पाणी पुरवण्यापूर्वी त्यावर अतिरिक्त प्रक्रिया करणे आवश्यक असते. बीएमसीने सांगितले की, शहराच्या संपूर्ण पाणीपुरवठा जाळ्यातील पाण्याची गुणवत्ता कायम राखण्यासाठी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना राबवल्या जात आहेत.
प्रशासनाची पुन्हा परीक्षा!
जुलैच्या पहिल्या आठवड्यातील मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण उडवल्यानंतर आता पुन्हा एकदा हवामान विभागाने मंगळवारी ऑरेंज ॲलर्ट दिल्याने प्रशासनाची पुन्हा कसोटी लागणार आहे. मंगळवारी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा, तर ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. संभाव्य पूरस्थिती, झाडे कोसळण्याच्या घटना आणि सखल भागांतील पाणी साचण्याचा धोका लक्षात घेऊन महापालिकेने नियंत्रण कक्ष, आपत्कालीन पथके आणि उदंचन पंप सज्ज ठेवले आहेत. मात्र, यापूर्वीच्या पावसात नालेसफाई आणि आपत्कालीन यंत्रणांमुळे निर्माण झालेल्या समस्या नक्की दूर झाल्या आहेत का, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
Maharashtra Rain: महाराष्ट्रावर काळे ढग दाटणार, पुढील २४ तास महत्त्वाचे; मुंबई, ठाणे पालघरला ऑरेंज अलर्ट
मुंबईमध्ये रविवारी दिवसभरात पावसाचा जोर फारसा नव्हता. कुलाबा येथे सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या कालावधीत ०.६ तर सांताक्रूझ येथे ०.४ मिमी. पावसाची नोंद झाली. मात्र रविवार रात्रीपासून मुंबई उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढला असून, सोमवार सकाळपर्यंत सांताक्रूझ येथे ८८.४ मिमी. पावसाची नोंद झाली. डहाणू येथे २४ तासांमध्ये ६२.३ मिमी. पाऊस पडला. ठाणे जिल्ह्यात ६७ मिमी., रायगड जिल्ह्यात ५३ तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ८५.२ मिमी. पाऊस पडल्याची नोंद झाली. प्रादेशिक हवामान विभागाने मंगळवारी मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी ऑरेंज ॲलर्ट दिला आहे. या काळात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकेल. तर, वाऱ्याचा वेग ५० ते ६० किलोमीटर प्रति तासपर्यंत पोहोचू शकेल. बुधवारी रायगडसाठीही ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. याच दिवशी मुंबई व ठाण्यात मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
