मुंबई: नीट पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतर मंतर इथं उपोषण करत असलेल्या सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जबरदस्तीने उपोषणस्थळाहून हटवल्यानंतर वांगचुक यांना समर्थन देण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथं आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकारवर घणाघाती टीका करत आधी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि नंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची आपली मागणी असणार असल्याचं म्हणत एल्गार पुकारला आहे. तसंच मुंबईतील आंदोलनानंतर आता दिल्लीतील आंदोलनकर्त्यांचीही आपण भेट घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल करत आदित्य ठाकरे म्हणाले की, “नीट, टीईटी असे एकामागोमाग एक पेपरलीक होत आहेत. एमपीएससीसाठीही दरवर्षी आंदोलनं करावी लागत आहेत. देशातील जनतेला अशिक्षित ठेवून अंधभक्त बनवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पण आम्ही अंधभक्त होऊ तर या देशाच्या मातीचे होऊ, आम्ही अंधभक्त छत्रपती शिवरायांचे होऊ, आम्ही अंधभक्त शाहू-फुले-आंबेडकरांचे होऊ. ज्यांनी आपल्याला संविधान दिलं त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आम्ही अंधभक्त होऊ. पण भाजपसमोर वाकणार नाही, झुकणार नाही. कापलं तरी चालेल पण आम्ही भाजपचे गुलाम होणार नाही,” असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपविरोधात आगामी काळात आपण आणखी आक्रमकपणे रस्त्यावर उतरणार असल्याचे जाहीर केले.
“आधी मंत्री प्रधान आणि नंतर प्रधानमंत्री यांचा राजीनामा”
सध्या शिक्षण क्षेत्रातील गोंधळावरून देशातील जनतेकडून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असली तरी आगामी काळात थेट पंतप्रधानांचा राजीनामा मागावा लागेल, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. “आपण सगळे इथं सोनम वांगचुक या आपल्या हिरोसाठी जमलो आहोत. इथं कोणत्याही एका पक्षाचे लोक आलेले नाहीत, तर विविध संघटनांचे लोक आले आहेत. सगळ्या विषयांवर आपलं एकमत कदाचित होणार नाही, पण एका विषयावर आपलं एकमत होऊ शकतं आणि ते म्हणजे देशाच्या भविष्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र यावंच लागेल. देशभरात सगळे युवा रस्त्यावर उतरले आहेत ते शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी. आज आपण मंत्री प्रधानचा राजीनामा मागतोय, पण उद्या हे उलटं करून प्रधानमंत्रीचाही राजीनामा मागायला आपण मागेपुढे पाहणार नाही,” असं ते म्हणाले.
आदित्य ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे:
– ज्या लोकांना देश बदलण्यासाठी लोकांनी बहुमत दिलं होतं, तेच लोक आज संविधान बदलण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
– एकीकडे इस्त्रोचे १०० शास्त्रज्ञ राजीनामा देऊन बाहेर पडत आहेत. या सरकारला इस्त्रो सांभाळता येत नाही, पण सरकारमधील लोक दुसऱ्या पक्षाचे खासदार फोडत आहे. असे सरकार तुम्हाला मान्य आहे का?
– २०१४ पर्यंत आपण ‘सबका मालिक एक है’ हे साईबाबांच्या बाबतीत ऐकत होतो. पण आता भाजपला विचारलं तर ते म्हणतात सबका मालिक अदानी है.
– महाराष्ट्रातील एक तरुण मुलगा जो अमेरिकेत काम करत होता त्या अभिजीत दिपकेबद्दल आम्हाला अभिमान आहे. जसा सोनम वांगचुक यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे, तसाच अभिजीतबद्दल अभिमान आहे. त्यांना भेटायला मी जाणार आहे. पण आम्ही असं ठरवलं होतं की, आधी आपण महाराष्ट्रात आंदोलन करून दाखवू, नंतर त्यांना दिल्लीत भेटायला जाऊ.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा