Hingane to Dhanakawadi Tunnel: पुणेकरांना सध्या हिंगणे ते धनकवाडी प्रवास करताना स्वारगेट आणि कात्रजमधील वाहतूक कोंडीतून प्रवास करावा लागतो. पण ही समस्या आता दूर होणार. नव्या बोगद्यामुळे अवघ्या ५-१० मिनिटांत अंतर पार होणार आहे.
हिंगणे (सिंहगड रस्ता) ते धनकवडी (सातारा रस्ता) या मार्गादरम्यान तळजाई टेकडीमुळे वाहनांना थेट जा-ये करता येत नाही. त्यामुळे नागरिकांना स्वारगेट किंवा कात्रजमार्गे साडेसात ते नऊ किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. या प्रवासासाठी साधारण ४० ते ५० मिनिटे लागतात. ही अडचण दूर करण्यासाठी महापालिकेने हिंगणे-तळजाई-धनकवडी बोगदा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. या बोगद्याचा डीपीआर तयार झाला आहे. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लवकरच निविदा प्रसिद्ध करणार असून, शक्य तितक्या लवकर हे काम सुरू करण्याची तयारीही महापालिकेने सुरू केली आहे.
New Pune City: नवी मुंबईच्या धर्तीवर ‘नवे पुणे’, पुरंदरमध्ये शहराचा नियोजित विस्तार करावा; नितीन गडकरींची सरकारला सूचना
दहा मिनिटांत प्रवास
या प्रकल्पात २.४ किलोमीटर लांबीचा मार्ग विकसित करण्यात येणार असून, त्यात ९३० मीटर लांबीचा चार-लेन (दोन अधिक दोन) बोगदा आणि दोन्ही बाजूंना ॲप्रोच रस्ते असतील. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हिंगणे ते धनकवडी हा प्रवास अवघ्या पाच ते दहा मिनिटांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे प्रवासाचे अंतर, वेळ, इंधनाचा वापर आणि वाहतूक कोंडी कमी होईल, असा महापालिकेचा दावा आहे.
‘नेटवर्क’मधील दुवा
प्रस्तावित बोगदा हा इंटरमिजिएट रिंग रोड (आयआरआर) नेटवर्कमधील महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. शहराच्या पश्चिम आणि दक्षिण भागांतील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. सिंहगड रस्ता, सातारा रस्ता परिसरातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पर्यावरणीय मंजुरी, भूसंपादन आणि आर्थिक तरतूद या महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील. या पार्श्वभूमीवर निविदा प्रक्रिया सुरू करण्याची तयारी महापालिकेने केली असून, त्यानंतर प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांना प्रारंभ होणार आहे.
वाकडेवाडीत बांधणार उड्डाणपूल
वाकडेवाडी परिसरातील कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने साखर संकुल येथून जुना पुणे-मुंबई महामार्गाकडे जाणारा उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर प्रस्तावित केला आहे. या उड्डाणपुलामुळे गणेशखिंड रस्त्यावरून थेट साखर संकुलमार्गे पुणे-मुंबई रस्त्यावर ये-जा करता येईल. या ७३.५२ कोटी रुपयांच्या खर्चाच्या उड्डाणपुलाला मान्यता देताना महापालिकेच्या स्थायी समितीने कलम ‘७२ ब’ अंतर्गत यासाठी पुढील वर्षांसाठीही आर्थिक दायित्व स्वीकारले आहे.
Dive Ghat Twin Tunnels: दुहेरी बोगद्यातून रस्ते आणि मेट्रो, पुरंदर विमानतळासाठी नव्या प्रकल्पाचा विचार; कुठे-कसा असेल?
महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सादर केलेल्या या प्रस्तावाला गुरुवारी स्थायी समितीने मान्यता दिली असून, आता हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे सादर होईल. गणेशखिंड रस्त्याने पिंपरी-चिंचवडकडे जायचे झाल्यास वाहनचालकांना संचेती रुग्णालय, पाटील इस्टेट येथून कोंडीतून वाट काढत जावे लागते. साखर संकुलकडून जुन्या पुणे-मुंबई रस्त्याकडे जाताना महापालिकेने भुयारी मार्ग तयार केला. मात्र, यामधून केवळ दुचाकी; तसेच काही प्रमाणात हलकी वाहनेच ये-जा करू शकतात. त्यामुळे वाकडेवाडी परिसरातील ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
