• Sat. Jul 18th, 2026

    Jayant Patil: अर्थमंत्रिपदासाठी स्पर्धेत? एनडीएत सहभागी होणार? राज्यभर उठलं चर्चांचं मोहोळ; जयंत पाटलांनी क्षणात सगळं थांबवलं!

    Jayant Patil: अर्थमंत्रिपदासाठी स्पर्धेत? एनडीएत सहभागी होणार? राज्यभर उठलं चर्चांचं मोहोळ; जयंत पाटलांनी क्षणात सगळं थांबवलं!

    पंढरपूर: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी मागील काही दिवसांत घेतलेल्या भेटीगाठींमुळे राजकीय संभ्रम निर्माण झाला असून विविध चर्चांना उधाण आलं आहे. पवारांची राष्ट्रवादी सत्ताधारी एनडीएसोबत जाईल आणि जयंत पाटील हे राज्याचे अर्थमंत्री होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. जयंत पाटील यांनी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने या चर्चेला आणखीनच बळ मिळालं. मात्र आता पाटील यांनीच या चर्चा फेटाळून लावल्या असून मी अर्थमंत्रिपदाच्या स्पर्धेत नसल्याचा खुलासा केला आहे.

    पंढरपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “मी अर्थमंत्रिपदासाठी कुठल्याही शर्यतीत नाही. गेल्या दोन-तीन दिवसांपासून प्रसारमाध्यमांनीच अशी चर्चा केल्याचे आणि मला दोन-तीन वेळा अर्थमंत्रिपदाची शपथ दिल्याचे दिसले ,” असा टोला पाटील यांनी लगावला आहे. शक्तिपीठ महामार्गविरोधी सद्बुद्धी दिंडीसाठी जयंत पाटील पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

    विलीनीकरणावर काय म्हणाले जयंत पाटील?

    राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा जोर धरत होती. मात्र, या चर्चांना आता खुद्द जयंत पाटील यांनीच पूर्णविराम दिला आहे. माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या म्हणजे केवळ करमणूक असल्याचे म्हणत, कोणत्याही विलीनीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही, असं पाटील यांनी स्पष्ट केलं. “एनडीएने आम्हाला निमंत्रण दिलं नाही, पक्षाचे सर्व आमदार आणि खासदार ठामपणे शरद पवार यांच्यासोबत आहोत. मी कुणालाही भेटलो तर टोकाचे अर्थ कसे निघतात,” असंही ते म्हणाले.

    दरम्यान, केवळ राजकीयच नाही, तर इतर सामाजिक मुद्द्यांवरही जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली. सध्या चर्चेत असलेला ‘शक्तीपीठ महामार्ग’ रद्द व्हावा, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात जयंत पाटील सहभागी झाले होते. त्याचबरोबर, सोनम वांगचूक यांच्याबाबत सरकारने घेतलेली भूमिका चुकीची असल्याचेही ते म्हणाले. एकीकडे वेगळी राजकीय चर्चा सुरू अशताना जयंत पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दलही भाष्य केले. उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनातून निमंत्रण आल्यास आपण नक्कीच उपस्थित राहू, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed