• Thu. Sep 3rd, 2026

‘जय महाराष्ट्र’मध्ये सत्यजित भटकळ यांची मुलाखत; गटशेती, ‘एआय’ आणि शाश्वत शेतीचा रोडमॅप याबाबत माहिती – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jul 17, 2026
‘जय महाराष्ट्र’मध्ये सत्यजित भटकळ यांची मुलाखत; गटशेती, ‘एआय’ आणि शाश्वत शेतीचा रोडमॅप याबाबत माहिती – महासंवाद

मुंबई, दि. १७: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ या महत्वाकांक्षी उपक्रमावरील विशेष मुलाखतीचा दुसरा भाग प्रसारित करण्यात येणार आहे. या भागात पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी उपक्रमाच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचे पैलू, गटशेतीची यशस्वी मॉडेल्स आणि राज्यातील शेतीच्या भविष्यासंदर्भातील विविध मुद्द्यांवर सविस्तर माहिती दिली आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात या विशेष मुलाखतीचा दुसरा भाग मंगळवार, दि. २१ जुलै २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित करण्यात येणार आहे.

मुलाखतीच्या दुसऱ्या भागात गटशेतीमुळे उत्पादनवाढ, खर्चात बचत, बाजारपेठेपर्यंत सुलभ पोहोच आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या संधी याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. तसेच स्मार्ट शेती, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, प्रशिक्षित मेंटर्सचे मार्गदर्शन, महिला व युवा शेतकऱ्यांचा सहभाग आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीसाठी आवश्यक नियोजन याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले आहे.

यावेळी कृषी विभाग, पाणी फाउंडेशन आणि शेतकरी यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली असून, पुढील पाच ते सात वर्षांत महाराष्ट्रातील शेती अधिक सक्षम, समृद्ध आणि शाश्वत करण्यासाठी आखण्यात आलेल्या दीर्घकालीन दृष्टीकोनाचाही उहापोह करण्यात आला आहे.

महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही हा कार्यक्रम उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका पूनम चांदोरकर यांनी केले आहे.

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

Facebook: https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube: https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

००००

जयश्री कोल्हे/स.सं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed