• Fri. Jul 17th, 2026
    Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पुढच्या पाच दिवसांत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार? वाचा A टू Z, हवामान विभागाचा इत्थंभूत अंदाज

    महाराष्ट्रात पुढच्या पाच दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मुळधार पावसाची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग हा ताशी 40 ते 50 किमी असा असणार आहे. यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाच्या सरी बरसणार आहेत. हवामान विभागाकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना आता पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. खरंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सर्वदूर पाऊस पडला होता. मुंबई, रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सातारा, पुणे या जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढलं होतं. या जिल्ह्यांसह इतर अनेक ठिकाणीदखील मुसळधार पाऊस पडला होता. पण 8 जुलैनंतर पावसाने जो ब्रेक घेतला तेव्हापासून महाराष्ट्रात पाऊस हवा तसा फिरकला नव्हता. पण आता पावसाच्या आशेचे ढग पुन्हा दाटून येत आहेत.

    राज्यात आता हळूहळू पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील वेगेवगेळ्या जिल्ह्यांमध्ये थोडा-थोडा का असेना, पण पाऊस पडत आहे. आगामी काळात पावसाचे ढग मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात पोहोचणार आहे. यामुळे राज्यात आगामी काळात चांगला पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, पुढच्या पाच दिवसांत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो, याबाबत हवामान विभागाकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. हवामान विभागाने जिल्हानिहाय याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

    या जिल्ह्यांमध्ये 16 जुलैच्या दुपारनंतर पावसाची शक्यता

    हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या तीनही ठिकाणी वाऱ्याचा वेग हा 30 ते 40 किमी प्रतितास असा असण्याची शक्यता आहे. यासोबतच अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    17 जुलै कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

    राज्यात 17 जुलैला सातारा, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

    18 जुलैला कुठे-कुठे पावसाची शक्यता?

    येत्या 18 जुलैसाठी परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विजांचा कडकडाटासह इथे जोरदार पावसाची शक्यता आहे.

    19 आणि 20 जुलैला या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार?

    हवामान विभाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना 19 आणि 20 जुलैसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या सर्व जिल्ह्यांमध्ये पुढचे पाचही दिवस पावसाची शक्यता आहे. तसेच 19 जुलैला पडणार नसला तरी 20 जुलैला अकोल्यात पाऊल पडण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग हा 40 ते 50 किमी प्रतितास असा राहणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.