• Tue. Jul 14th, 2026

    एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 14, 2026
    एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ – महासंवाद

    मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त विद्या विहार येथील विभागीय कार्यालयातून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार दिलीप लांडे, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांच्यासह महामंडळाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या अभियानाच्या माध्यमातून राज्यभरातील एसटीची बसस्थानके, आगारे, कार्यालये आणि विविध परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले.

    परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, आजचा कार्यक्रम हा केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित नसून भावी पिढ्यांसाठी हिरवा, समृद्ध आणि सुरक्षित महाराष्ट्र घडविण्याचा सामूहिक संकल्प आहे. वाढते जागतिक तापमान, अनियमित पर्जन्यमान, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर आणि उष्णतेच्या लाटांसारख्या पर्यावरणीय संकटांचा सामना करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

    झाडे ही पृथ्वीची फुफ्फुसे असून ती प्राणवायू पुरवतात, कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात, तापमान नियंत्रित ठेवतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे एक झाड लावणे म्हणजे भविष्यातील अनेक संकटांवर उपाय उभा करणे होय, असेही त्यांनी सांगितले.

    एसटी महामंडळ हे केवळ प्रवाशांना सेवा देणारे परिवहन माध्यम नसून समाजाशी नाळ जोडलेली सामाजिक संस्था आहे. त्यामुळे समाजहिताचे आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविणे ही देखील एसटीची सामाजिक बांधिलकी असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.

    वृक्षारोपण करून जबाबदारी संपत नाही, तर प्रत्येक रोप जगविणे, त्याचे संगोपन करणे आणि संरक्षण करणे हे अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी “एक कर्मचारी – एक वृक्ष” आणि “एक नागरिक – एक वृक्ष” हा संकल्प प्रत्येकाने स्वीकारावाअसे आवाहन केले. एसटीच्या प्रत्येक आगारात, बसस्थानकात आणि कार्यालय परिसरात हिरवाई निर्माण करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि प्रवाशांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही परिवहन मंत्री सरनाईक यांनी केले.

    ७८ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करताना, निसर्गाचे संरक्षण म्हणजे मानवजातीचे संरक्षण असल्याचे अधोरेखित करून हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

    0000

    संजय ओरके/विसंअ

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed