• Mon. Jul 13th, 2026

    ‘चौरंग : स्वर स्नेहल’मधून संगीतकार स्नेहल भाटकर यांच्या सुरेल जीवनप्रवासाला अभिवादन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 13, 2026
    ‘चौरंग : स्वर स्नेहल’मधून संगीतकार स्नेहल भाटकर यांच्या सुरेल जीवनप्रवासाला अभिवादन – महासंवाद

    मुंबई, दि. १३ : सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ज्येष्ठ संगीतकार स्नेहल भाटकर यांच्या जयंतीनिमित्त ‘चौरंग : स्वर स्नेहल’ या विशेष संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, 17 जुलै 2026 रोजी सायंकाळी 7.00 वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे करण्यात आले आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक अशोक हांडे यांची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन लाभलेल्या या कार्यक्रमातून संगीतकार स्नेहल भाटकर यांच्या समृद्ध संगीतप्रवासाचा सुरेल मागोवा घेण्यात येणार आहे.

    स्नेहल भाटकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या मधुर, भावस्पर्शी आणि दर्जेदार संगीताने समृद्ध केले. त्यांच्या संगीत रचनांमध्ये भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा, भावनांची सूक्ष्म अभिव्यक्ती आणि सुरेलतेचा उत्कृष्ट मिलाफ आढळतो. त्यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गीते आजही रसिकांच्या मनात तितक्याच प्रेमाने गुणगुणली जातात आणि भारतीय संगीतविश्वातील अमूल्य ठेवा म्हणून ओळखली जातात.

    ‘चौरंग : स्वर स्नेहल’ या कार्यक्रमातून स्नेहल भाटकर यांच्या जीवनातील विविध टप्पे, संगीत क्षेत्रातील योगदान, त्यांच्या कारकिर्दीतील संस्मरणीय आठवणी आणि अजरामर गीतांचा सुरेल प्रवास रंगमंचावर उलगडण्यात येणार आहे. संगीत, निवेदन, नाट्यरूपांतर आणि दृश्य मांडणी यांच्या प्रभावी संगमातून रसिकांना त्यांच्या संगीतमय जीवनगाथेचा अविस्मरणीय अनुभव मिळणार आहे.

    ज्येष्ठ रंगकर्मी अशोक हांडे यांची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शनातून साकारलेला हा कार्यक्रम स्नेहल भाटकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, संगीतदृष्टीचा आणि सांगीतिक वारशाचा सर्वांगीण परिचय करून देणारा ठरणार आहे. त्यांच्या सुरेल रचनांमधून भारतीय संगीत संस्कृतीची समृद्ध परंपरा आणि भावविश्वाचा अनोखा आविष्कार या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे.

    हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार, यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध सांगीतिक वारशाचे जतन व संवर्धन करणे तसेच थोर संगीतकारांचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.

    या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून संगीतप्रेमी, विद्यार्थी, संशोधक, कलाकार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

     

    00000

    संजय ओरके/ विसंअ

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed