• Mon. Jul 13th, 2026

    ‘माऊली’ संगीतमय नाट्यप्रयोगातून संत ज्ञानेश्वरांच्या जीवनचरित्राचा दिव्य आविष्कार – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 13, 2026
    ‘माऊली’ संगीतमय नाट्यप्रयोगातून संत ज्ञानेश्वरांच्या जीवनचरित्राचा दिव्य आविष्कार – महासंवाद

    मुंबई, दि. १३ : सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या 750 व्या जयंती वर्षानिमित्त ‘माऊली’ या विशेष आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार, 21 जुलै 2026 रोजी रात्री 8 वाजता श्री शिवाजी नाट्य मंदिर, दादर, मुंबई येथे करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वरांच्या जीवनकार्यावर आधारित संगीतमय नाट्यप्रवास हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.

    संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अलौकिक ज्ञान, अध्यात्म आणि भक्तीच्या माध्यमातून समाजाला समता, मानवता आणि विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. ‘ज्ञानेश्वरी’, ‘अमृतानुभव’ आणि ‘पसायदान’ या त्यांच्या अजरामर साहित्यकृती आजही समाजाला दिशा देणाऱ्या ठरत आहेत. ‘दुरितांचे तिमिर जावो’ हा सार्वकालिक संदेश मानवकल्याणाची प्रेरणा देणारा आहे.

    ‘माऊली’ या संगीतमय नाट्यप्रयोगातून संत ज्ञानेश्वरांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंग, त्यांचे अध्यात्म, भक्तीमार्ग, समाजप्रबोधन आणि मानवतेचा संदेश संगीत, अभिनय, नृत्य आणि प्रभावी रंगमंचीय सादरीकरणाच्या माध्यमातून उलगडण्यात येणार आहे. या कार्यक्रमातून संत परंपरेचा वैभवशाली वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

    हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचे, सांस्कृतिक वारशाचे आणि आध्यात्मिक मूल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.

    या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, संत ज्ञानेश्वरांच्या जीवनकार्याचा आणि त्यांच्या कालातीत संदेशाचा संगीतमय अनुभव घेण्याची ही एक आगळीवेगळी संधी आहे. कला रसिक, वारकरी, विद्यार्थी, संशोधक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

    000000

    संजय ओरके/ विसंअ

     

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed