नाशिक, दि. १२ : ‘उन्नत नाशिक अभियान’ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘हरित कुंभ – हरित मान्सून’ अर्थात ‘मिशन ग्रीन मान्सून’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात आज नंदिनी नदीच्या दोन्ही काठांवर राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. देशात हरित शहर म्हणून नाशिक शहराची ओळख निर्माण करू, असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
आज सकाळी पिंपळगाव बहुला येथे महादेव मंदिर परिसरात नंदिनी नदीच्या काठावर, भाभा नगर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, महापौर हिमगौरी आडके, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, सभापती समाधान देवरे, नगरसेवक विश्वास नांगरे, गटनेते श्याम बडोदे, इंदुमती नागरे, माधुरी बोरकर, सचिन मराठे, संध्या कुलकर्णी, चंद्रकांत खोडे, मंगला ननावरे, माजी महापौर सतीश कुलकर्णी, शेखर गायकवाड, चंद्रकिशोर पाटील, राजेश पंडित आदी उपस्थित होते. यावेळी नंदिनी नदीचे जलपूजन हे मंत्री मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, “स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि हरित नाशिक घडविण्याचा आपण सर्वांनी संकल्प केला आहे. नागरिकांनी केलेल्या या निर्धारामुळे येणाऱ्या काळात नाशिकचा चेहरा मोहरा निश्चितच बदललेला दिसेल. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकला देशातील आदर्श, पर्यावरणपूरक आणि नियोजनबद्ध शहर म्हणून विकसित करण्यासाठी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे.”
“देशात सर्वाधिक वृक्ष असलेले शहर म्हणून नाशिकची ओळख निर्माण करणे हे आपल्या सर्वांचे सामूहिक ध्येय आहे. यासाठी शासनासोबत सर्व समाजघटक, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संघटना, उद्योग क्षेत्र आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. विविध सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेत या अभियानात मोलाचे योगदान दिले असून त्यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. आजपर्यंत ‘मिशन ग्रीन मान्सून’ अंतर्गत वृक्षलागवडीसाठी नाशिककरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा पर्यावरणाविषयीची त्यांची बांधिलकी अधोरेखित करणारा आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘मिशन ग्रीन मान्सून’ अंतर्गत यापूर्वी शहरातील विविध भागांत वृक्षारोपण करण्यात आले आहे. तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नंदिनी नदी महास्वच्छता अभियान राबवून नदीपात्र स्वच्छता, खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामे करण्यात आली. आता त्या नदीकाठावर मोठ्या प्रमाणावर देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करून नंदिनी नदीला कायमस्वरूपी हरित संरक्षण कवच देण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्यात येत आहे.
या अभियानात विविध सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी नागरिक, स्वामी नरेंद्राचार्य महाराजांच्या नाणीज पीठाचे अनुयायी तसेच विविध सेवाभावी संस्थांनी सहभाग घेत वृक्षारोपण केले. वृक्षलागवडीसोबतच त्यांचे संवर्धन करण्याचाही संकल्प यावेळी करण्यात आला.
00000
