ठाणे, दि. ८: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील मच्छिमारांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. समुद्रातील मत्स्यसाठ्याचे जतन करणे आणि पावसाळ्यात मच्छिमारांच्या जीविताचे व वित्ताचे रक्षण व्हावे, या उद्देशाने दरवर्षी लागू करण्यात येणाऱ्या पावसाळी मासेमारी बंदीच्या कालावधीत आता शासनाने महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. यापूर्वी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत असणारी ही मासेमारी बंदी आता थेट १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे यंदा मच्छिमारांना एकूण ७६ दिवस समुद्रात मासेमारीसाठी जाण्यावर बंदी राहणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहायक आयुक्त (तांत्रिक), ठाणे-पालघर दिपाली बांदकर यांनी यासंदर्भातील सुधारीत कार्यालयीन आदेश जारी केले आहेत. शासनाने २९ जून २०२६ रोजीच्या नवीन आदेशान्वये जुन्या नियमात बदल केला असून, त्यानुसार यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौकांसाठी सुधारित पावसाळी मासेमारी बंदीचा हा नवीन कालावधी लागू करण्यात आला आहे. या नव्या निर्णयामुळे १ जून २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६ या सुधारित कालावधीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
भविष्यातील मत्स्यसाठ्याचे जतन करण्यासाठी आणि पारंपरिक मच्छिमारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी अनधिकृत मासेमारीला आळा घालणे अत्यंत आवश्यक आहे. या आदेशाचे उल्लंघन करून जर कोणतीही नौका समुद्रात बेकायदेशीरपणे मासेमारी करताना आढळली, तर तिच्यावर सागरी कायद्यांतर्गत कडक कारवाई केली जाईल. इतकेच नव्हे तर, जी कोणतीही मच्छिमार सहकारी संस्था अशा अनधिकृत मासेमारीला प्रोत्साहन देईल किंवा प्रशासनाला सहकार्य करणार नाही, त्या संस्थेची नोंदणी थेट रद्द करण्याचा प्रस्ताव उपनिबंधक (मत्स्य) यांच्याकडे पाठवला जाईल, असा सक्त इशारा सहायक आयुक्तांनी दिला आहे.
या सुधारित बंदी कालावधीबाबत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व मच्छिमार सहकारी संस्था, त्यांचे चेअरमन आणि मच्छिमारांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व मासळी उतरवण्याच्या केंद्रांवर आणि संस्थांमध्ये पोस्टर्स, बॅनर्स, सोशल मीडिया आणि कार्यशाळांच्या माध्यमातून या नव्या नियमांची माहिती दिली जाईल, जेणेकरून कोणत्याही मच्छिमाराचे नुकसान होणार नाही आणि नियमांचे योग्य पालन होईल.
००००
