अहिल्यानगर: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांची भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत झालेली कथित भेट सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार असल्याने या दोन नेत्यांमध्ये बैठक झाल्याचं सांगितलं जात आहे. पक्षाच्या नव्या वाटचालीबाबत चर्चा करण्यासाठी जयंत पाटील हे आपल्या आमदार-खासदारांसोबत बैठका घेत असल्याचाही दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी आपली भूमिका मांडली आहे.
भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता निलेश लंके म्हणाले की, “जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची भेट कामानिमित्त झाली असेल. आम्हीही अनेक नेत्यांच्या भेटी घेत असतो. मात्र आमच्या पक्षाच्या कोणत्याही गुप्त बैठका झालेल्या नाहीत.प्रत्येक भेटीमागे राजकीय समीकरणे शोधण्याचे कारण नाही,” असं सांगत लंके यांनी सुरू असलेल्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
“आम्ही शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेईल, त्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे अफवा आणि चर्चांवर भाष्य करण्याचे कारण नाही,” असं सांगत निलेश लंके यांनी पक्षांतर्गत मतभेदांच्या चर्चांनाही पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. “विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना विकासनिधी मिळू नये, यासाठी डावपेच आखले जातात. ही प्रवृत्ती लोकशाहीसाठी घातक आहे. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना डावलण्याऐवजी संपूर्ण राज्याच्या विकासाचा विचार करावा. सर्व मतदारसंघांना समान न्याय आणि समान निधी मिळालाच पाहिजे,” अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी केली.
लंकेंच्या नेतृत्वात महावितरणविरोधात आंदोलन
महावितरणच्या कारभाराविरोधात खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली आज अहिल्यानगरात जोरदार जनआंदोलन छेडण्यात आले. चाणक्य चौकातून निघालेल्या पदयात्रेत शेकडो नागरिक सहभागी झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून मोर्चा महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडकला. यावेळी घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान स्टेशन रोड परिसरातील आनंदनगर येथे विजेच्या धक्क्याने साडेतीन वर्षांच्या चिमुरडीचा झालेला दुर्दैवी मृत्यू, हा संतापाचा प्रमुख मुद्दा ठरला. त्या निष्पाप चिमुरडीला न्याय मिळालाच पाहिजे अशी आक्रमक भूमिका लंके यांनी घेत महावितरणच्या हलगर्जीपणावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. यावेळी लंके यांनी महावितरणसमोर अघोषित व अनियमित वीजकपात, जळालेले ट्रान्सफॉर्मर वेळेत न बदलणे, स्मार्ट मीटरमुळे वाढलेली व चुकीची वीजबिले, अतिवृष्टीमुळे कोलमडलेली वीजयंत्रणा, सौरऊर्जा व नेट मीटरिंग प्रकरणांतील विलंब, कृषी वीजजोडणीतील रखडलेली कामे, तक्रार निवारण यंत्रणेचे अपयश आणि वारंवार होणारे तांत्रिक बिघाड अशा विविध प्रश्नांचा पाढाच वाचला. या सर्व मागण्यांचे सविस्तर निवेदनही अधिकाऱ्यांना देण्यात आले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा