• Wed. Jul 8th, 2026

    “मुख्यमंत्री जनआरोग्य” शिबिरांना जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद! – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 8, 2026
    “मुख्यमंत्री जनआरोग्य” शिबिरांना जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद! – महासंवाद

    नंदुरबार, दिनांक ८ जुलै (जिमाका): राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने, संपूर्ण राज्यभर 1 जुलै ते 31 जुलै 2026 या कालावधीत “मुख्यमंत्री जनआरोग्य” शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सचिवालयांतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष (मंत्रालय, मुंबई) यांचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत  जिल्ह्यात आयोजित शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार धामणे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

    जिल्ह्यात 4 जुलै 2026 पासून या आरोग्य शिबिरांना सुरुवात करण्यात आली असून 6 जुलैपर्यंत एकूण 15 जनआरोग्य शिबिरे यशस्वीपणे पार पडली. या शिबिरांमध्ये तब्बल 427 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन व उपचारासाठी संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात आली. यामध्ये गंभीर स्वरूपाच्या 7 रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले असून, त्यातील 4 बालकांवर ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम’ अंतर्गत जिल्हा रुग्णालय येथे यशस्वी शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या आहेत.

    या अभियानाचा एक विशेष उपक्रम म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, जनकल्याण रक्तपेढी आणि स्मित हॉस्पीटल (नंदुरबार) यांच्या संयुक्त समन्वयाने समशेरपूर कारखाना येथे विशेष रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला असून एकूण 63 रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. या सर्व शिबिरांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांची सविस्तर माहिती देऊन नागरिकांमध्ये जनजागृती व जनप्रबोधन करण्यात आले. शासनाच्या या मोफत आरोग्यविषयक योजनांचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

    हे अभियान यशस्वी करण्यासाठी जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, डी.पी. गावित आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय पथराई, धर्मादाय रुग्णालये, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना संलग्न रुग्णालयांचे संयुक्त सहकार्य लाभत आहे. तसेच जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे यांच्या मोलाच्या सहकार्य लाभत असल्याचेही मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. धामणे यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

    0000000000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *