▪️निवारा केंद्रे, हिरकणी कक्ष आणि शुद्ध पाणी व्यवस्थेसह सर्वसमावेशक आरोग्य नियोजन
▪️ आज श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र आळंदीत सेवा सुरु
पुणे दि. ७ जुलै : आषाढी वारी म्हणजे केवळ श्रद्धेचा महासागर नाही, तर लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारीही तितकीच मोठी असते. ऊन, पाऊस, लांबचा पायी प्रवास, बदलते हवामान आणि मोठी गर्दी या सर्व आव्हानांमध्ये प्रत्येक वारकरी सुरक्षित आणि निरोगी राहावा, यासाठी यंदाच्या पालखी सोहळा २०२६ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने “भक्ती विठ्ठलाची, सेवा आरोग्याची” हे ब्रीदवाक्य स्वीकारत अत्यंत व्यापक आणि नियोजनबद्ध व्यवस्था उभी केली आहे. आज श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र आळंदीत सेवा सुरु करण्यात आली आहे.

७ जुलै ते २९ जुलै या संपूर्ण वारी कालावधीत पालखी मार्गावरील प्रत्येक टप्प्यावर वैद्यकीय सेवा उपलब्ध राहणार आहेत. तब्बल १९२ वैद्यकीय सेवा पथके, १३३ वैद्यकीय अधिकारी, ३७८ आरोग्य कर्मचारी, ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ४४ आरोग्य उपकेंद्रे वारकऱ्यांच्या सेवेत कार्यरत राहतील. एवढेच नव्हे, तर दर दोन किलोमीटरवर रुग्णवाहिका पथके तैनात करण्यात आली असून पालखीसोबत सुरुवातीपासून परतीच्या प्रवासापर्यंत २४ तास कार्यरत सहा फिरती वैद्यकीय पथके सतत सेवेत असतील.
गंभीर परिस्थितीत तातडीने उपचार मिळावेत यासाठी १७६ रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये १०८ आपत्कालीन सेवेंतील ALS आणि BLS रुग्णवाहिका तसेच १०२ सेवेंतील रुग्णवाहिका समाविष्ट आहेत. त्यामुळे कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देणे शक्य होणार आहे.
वारीत सहभागी होणाऱ्या दिंडी प्रमुखांना ४,५०० औषध किट देण्यात येणार आहेत. ताप, वेदना, पोटाचे विकार, अॅलर्जी, निर्जलीकरण आणि किरकोळ जखमांवर प्राथमिक उपचार करता यावेत, यासाठी पॅरासिटामॉल, डायक्लोफेनाक, मेट्रोनिडाझोल, सेंट्रिझिन, ओआरएस, मलम आणि पट्ट्यांचा समावेश या किटमध्ये करण्यात आला आहे.
महिला आणि बालकांच्या गरजांचा विशेष विचार करत पालखी मार्गावर १५ निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. येथे विश्रांती, औषधोपचार, तज्ज्ञ डॉक्टर आणि रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध असेल. त्याचबरोबर स्तनदा माता आणि बालकांसाठी १२ हिरकणी कक्ष सुरू करण्यात आले असून, स्वतंत्र विश्रांती व्यवस्था, वैद्यकीय सेवा आणि बालकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आरोग्यदायी वारीसाठी शुद्ध पाणी हा महत्त्वाचा घटक मानत आरोग्य आणि पाणीपुरवठा विभागाने विशेष खबरदारी घेतली आहे. २०० पाण्याचे टँकर्स आणि ९८ फिलिंग पॉईंट्स कार्यरत राहतील. प्रत्येक टँकरची पाणी गुणवत्ता तपासल्यानंतरच तो पुढे पाठवला जाणार असून, खाजगी टँकर्सच्या तपासणीसाठी दर पाच किलोमीटरवर स्वतंत्र तपासणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. जलजन्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी ही व्यवस्था महत्त्वाची ठरणार आहे.
वारीदरम्यान अन्नातून होणारे आजार टाळण्यासाठी पालखी मार्गावरील हॉटेल्स, ढाबे आणि उपहारगृहांची नियमित तपासणी केली जाणार आहे. उघडे, शिळे अथवा नासलेले अन्न विक्रीस प्रतिबंध करण्यात आला असून, अन्न हाताळणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणीही बंधनकारक करण्यात आली आहे.
यंदाच्या नियोजनातील आणखी एक दूरदृष्टीचा निर्णय म्हणजे “आषाढी पालखी विकास आराखडा”. ग्रामीण भागातील गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी पालखी मार्गावरील निवडक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कायमस्वरूपी अतिदक्षता विभाग स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. वारीपुरती मर्यादित न राहता ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला दीर्घकालीन बळ देणारे हे पाऊल ठरणार आहे.
आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या अध्यात्माची ओळख आहे. या अध्यात्माच्या प्रवासात लाखो वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठल सेवा मानत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने उभारलेली ही सर्वसमावेशक यंत्रणा म्हणजे सेवा, संवेदनशीलता आणि सुयोग्य नियोजनाचा आदर्श आहे. विठ्ठलाच्या नामस्मरणाबरोबरच प्रत्येक वारकरी सुरक्षित, निरोगी आणि आनंदाने पंढरीची वाट चालू शकेल, यासाठी आरोग्य विभागाची ही सज्जता वारीच्या व्यवस्थापनातील एक महत्त्वाचा आणि प्रेरणादायी अध्याय ठरत आहे.
0000
