• Fri. Jul 3rd, 2026

    ॲग्रीस्टॅक म्हणजे काय? अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत त्याचा काय उपयोग होणार ? – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 3, 2026
    ॲग्रीस्टॅक म्हणजे काय? अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत त्याचा काय उपयोग होणार ? – महासंवाद

    राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक, अचूक आणि जलद करण्यासाठी ॲग्रीस्टॅक (AgriStack) या आधुनिक डिजिटल व्यवस्थेचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात ” ॲग्रीस्टॅक म्हणजे नेमके काय?” आणि “कर्जमुक्ती योजनेत त्याचा काय उपयोग होणार?” असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

    सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, ॲग्रीस्टॅक म्हणजे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख आणि शेतीशी संबंधित माहितीची एकत्रित संगणकीय नोंद. या प्रणालीमध्ये शेतकऱ्याची जमीन, पीक, आधार क्रमांक, बँक खाते, पीक कर्ज आणि इतर आवश्यक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध राहते. त्यामुळे शासनाला योग्य शेतकरी ओळखणे आणि योजनांचा लाभ थेट पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे अधिक सोपे होते.

    अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ॲग्रीस्टॅकची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शासनाने या योजनेसाठी पात्रता निश्चित करताना शेतकऱ्यांची माहिती पडताळण्यासाठी ॲग्रीस्टॅकचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाभ मिळवू इच्छिणाऱ्या पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आपली माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.

    ॲग्रीस्टॅकमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होणार आहेत. कर्ज खात्याची आणि जमिनीची माहिती पडताळण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होईल. लाभार्थी निवड अधिक अचूकपणे करता येईल. पात्र शेतकऱ्यांना लाभ देताना विलंब कमी होण्यास मदत होईल. तसेच एकाच माहितीच्या आधारे विविध कृषी योजनांचा लाभ देणेही सुलभ होईल.

    ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करताना आधार प्रमाणीकरण, जमिनीची माहिती, मोबाईल क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील अचूक असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली माहिती काळजीपूर्वक तपासून अद्ययावत ठेवावी. माहितीमध्ये काही त्रुटी असल्यास त्या संबंधित यंत्रणेमार्फत वेळेत दुरुस्त करून घ्याव्यात.

    अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ॲग्रीस्टॅक ही एक महत्त्वाची कडी ठरणार आहे. यामुळे पात्र शेतकऱ्यांची ओळख निश्चित करणे, माहितीची पडताळणी करणे आणि लाभ वितरण अधिक पारदर्शक पद्धतीने करणे शक्य होणार आहे.

    याशिवाय, भविष्यात कृषी क्षेत्रातील विविध शासकीय योजना, अनुदाने, पीक विमा, कृषी सल्ला आणि इतर सेवा शेतकऱ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठीही ॲग्रीस्टॅक उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने ॲग्रीस्टॅक बाबत योग्य माहिती जाणून घेऊन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करणे हे स्वतःच्या हिताचे आहे.

    आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना अधिक जलद, अचूक आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचविण्याच्या दिशेने ॲग्रीस्टॅक हे महत्त्वाचे पाऊल आहे. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ कोणत्याही अडचणीशिवाय मिळावा, यासाठीही ॲग्रीस्टॅक मध्ये नोंदणी आणि माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक  आहे.

    जिल्हा माहिती कार्यालय, बुलढाणा

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed