• Tue. Aug 25th, 2026

Rohit Pawar: कॅबिनेट बैठकीच्या वेळेत बदल, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्तेत जाणार? चर्चांचं वादळ उठताच रोहित पवार रोखठोक बोलले!

नागपूर : राज्य मंत्रिमंडळाच्या दर आठवड्यात होणाऱ्या नियोजित बैठकीची वेळ यावेळी बदलण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक बोलावण्यात आल्याने सत्तेची समीकरणे बदलणार असल्याची चर्चा रंग होती. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत सहभागी होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा कुठे सुरू आहे? भाजपला वाटतं म्हणून ते चर्चा सुरू करतात किंवा दुसऱ्या पक्षाला वाटतं म्हणून चर्चा सुरू होते. पवार साहेबांनी स्पष्ट केलं आहे की, आम्ही एकत्र येणार नाही, शरद पवार साहेबांनी गेल्या ६५ वर्षांत ज्या विचारांना जपले, वाढवले आणि ताकद दिली, तोच विचार पुढे घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा आणि रस्त्यावर उतरून सामान्य जनतेची बाजू मांडणारा पक्ष म्हणून आम्ही काम करत राहणार आहोत. त्यामुळे पक्षाच्या विलीनीकरणाचा प्रश्नच येत नाही,” असे रोहित पवार म्हणाले.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि इतर काही खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावरून शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार असल्याच्या चर्चांनाही रोहित पवार यांनी फेटाळून लावले. सुप्रिया ताई आणि काही खासदार पंतप्रधानांना भेटले असतील तर त्यात चुकीचं काय आहे? पंतप्रधान हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्याकडून काम व्हावं, अशी त्यांची अपेक्षा असू शकते. एखाद्याने पंतप्रधानांची भेट घेतली म्हणून आम्ही एनडीएसोबत चाललो, असा त्याचा अर्थ होत नाही, असा दावा रोहित यांनी केला.

रोहित पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील प्रश्नांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्याकडे आम्हालाही जावे लागते. अनेकदा मी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सर्वाधिक बोलतो, मात्र त्यांच्याकडे पद आणि सत्ता आहे. सामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांच्याकडे जाणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे केंद्राशी संबंधित प्रश्नांसाठी पंतप्रधानांची भेट घेतली जाऊ शकते. राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून अशा भेटीगाठी होत असतात. त्या खुल्या पद्धतीने होत असतील आणि त्यातून जनतेच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्यात गैर काय, असा सवालही रोहित पवार यांनी केला.

दरम्यान, नागपुरात झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘जेन झी’ संवाद कार्यक्रमावरही रोहित पवार यांनी टीका केली. स्वतःहून आलेले लोक आणि आणलेले लोक यात फरक असतो. राहुल गांधींचा कार्यक्रम हा स्वतःहून आलेल्या लोकांचा कार्यक्रम होता, तर नागपुरातील कार्यक्रम हा आणलेल्या लोकांचा होता, असा दावा त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी जेन झींशी खऱ्या अर्थाने संवाद साधायला हवा होता. नागपूर शहरात मागील तीन महिन्यांत ३२ खून झाले, तुम्ही गृहमंत्री आहात, काय करत आहात, असा प्रश्न सामान्य तरुणांनी मुख्यमंत्र्यांना विचारला असता. मात्र ठरवून दिलेल्या प्रश्नांचीच उत्तरे देण्यात आली, तसेच कार्यक्रमात क्रिकेटपटू तिलक वर्मा यांची उपस्थिती आणि विविध स्पर्धांमधून आलेल्या विद्यार्थ्यांचा सहभाग यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. आम्हाला तुमच्या मन की बात नको, आम्हाला जनाची म्हणजे लोकांची गोष्ट ऐकायची आहे. खरा संवाद हा लोकांमध्ये जाऊन होतो, असे रोहित पवार म्हणाले.

यावेळी रोहित पवार यांनी भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांच्यावरही निशाणा साधला. धर्माचा प्रसार करणारा नेता म्हणून भाजपमधून त्यांच्याकडे पाहिले जाते. मात्र अयोध्येतील राम मंदिरातील कथित भ्रष्टाचाराच्या वेळी तुम्ही कुठल्या बिळात लपले होते? असा सवाल त्यांनी केला. तसेच मच्छीमारांना डिझेल परवडत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत कर्नाटकात डिझेल ७२ रुपयांना मिळते, असेही त्यांनी सांगितले.