• Wed. Jul 1st, 2026
    विधानपरिषद कामकाज – महासंवाद

    विधान परिषदेच्या गौरवशाली परंपरेला उपसभापती सचिन अहिर बळकटी देतील – सभापती प्रा. राम शिंदे

    मुंबई, दि. १: विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांच्या प्रदीर्घ संसदीय, प्रशासकीय आणि सामाजिक अनुभवाचा लाभ विधान परिषदेला निश्चितच होईल. सभागृहाचे कामकाज निष्पक्ष, संयमाने आणि नियमबद्ध पद्धतीने पार पाडत ते विधान परिषदेच्या गौरवशाली संसदीय परंपरेला अधिक बळकटी देतील, असा विश्वास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला.

    विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना सभापती प्रा. राम शिंदे बोलत होते.

    उपसभापती प्रा. शिंदे म्हणाले, १९९९ पासून विधिमंडळाच्या कामकाजाचा अनुभव असलेले सचिन अहिर संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर विधान परिषदेचे अकरावे उपसभापती ठरले आहेत. त्यांनी राज्यमंत्री म्हणून तसेच विरोधी पक्षातील सदस्य म्हणून जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडल्या आहेत. त्यामुळे संसदीय कामकाजातील त्यांच्या अनुभवाचा उपसभापती म्हणून निश्चितच उपयोग होईल.

    उपसभापतीपद हे केवळ सन्मानाचे नसून अत्यंत जबाबदारीचे पद असल्याचे सांगून ते सभागृहाचे कामकाज निष्पक्षपणे, संयमाने आणि संसदीय नियमांचे पालन करून चालवतील. सभागृहातील सर्व सदस्यांना समान न्याय देत लोकशाही मूल्ये आणि संसदीय परंपरा अधिक समृद्ध करण्याचे कार्य उपसभापती सचिन अहिर करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    कामगार चळवळीत सचिन अहिर यांनी दिलेल्या योगदानाचाही सभापतींनी विशेष उल्लेख केला. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या माध्यमातून त्यांनी कामगारांच्या हितासाठी अनेक उपक्रम राबविले तसेच गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळावीत यासाठी सातत्याने प्रयत्न केले, असे त्यांनी सांगितले.

    सभागृहातील सर्व सदस्यांच्या सहकार्याने विधान परिषदेची प्रतिष्ठा, संसदीय मूल्ये आणि लोकशाही परंपरा अधिक उंचावण्यासाठी  उपसभापती सचिन अहिर यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त करून सभापती प्रा. राम शिंदे यांनी त्यांना पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

     

    उपसभापती म्हणून सर्वांना समान न्याय देणार – उपसभापती सचिन अहिर

    सर्वसामान्य जनता, कष्टकरी, कामगार आणि महाराष्ट्राच्या मातीशी असलेली माझी बांधिलकी कालही होती, आजही आहे आणि उद्याही कायम राहील. उपसभापती म्हणून पक्षभेद न करता प्रत्येक सदस्याला समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन, अशी ग्वाही विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांनी दिली.

    उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर विधान परिषदेत आभार व्यक्त करताना उपसभापती अहिर बोलत होते. एका सर्वसामान्य कामगार कार्यकर्त्याला सभागृहाने उपसभापतीपदाची जबाबदारी दिली असून “हा माझा वैयक्तिक सन्मान नसून सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आणि कामगार चळवळीचा सन्मान आहे,” असे ते म्हणाले.

    आपल्या संघर्षमय प्रवासाचा उल्लेख करताना उपसभापती अहिर यांनी मध्यमवर्गीय कुटुंबातील बालपण, चाळ संस्कृतीतील जीवन, परदेशातील नोकरीतील अपयश, खटाव मिलमध्ये वेल्डर मदतनीस म्हणून केलेले काम आणि त्यानंतर कामगार चळवळीतून सार्वजनिक जीवनात झालेला प्रवास सांगितला. कामगारांच्या प्रश्नांसाठी लढताना मिळालेल्या अनुभवामुळेच आजची जबाबदारी पार पाडण्याचे बळ मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

    दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी सदस्यांचे आभार मानले. उपसभापती म्हणून संसदीय परंपरा, सभागृहाची गरिमा आणि सर्व सदस्यांना न्याय देणे हेच आपले सर्वोच्च प्राधान्य राहील, असे स्पष्ट करत त्यांनी, “सभागृहात प्रत्येक सदस्याला समान संधी आणि न्याय मिळेल, यासाठी प्रामाणिकपणे काम करीन,” अशी ग्वाही दिली.

    0000

    गजानन पाटील/विसंअ

     

    विधान परिषद उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमताने झालेली निवड लोकशाही परंपरांचा विजय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई, दि. १: महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमताने झालेली निवड ही सभागृहाच्या लोकशाही परंपरा आणि संसदीय मूल्यांचा विजय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

    विधान परिषदेत सचिन अहिर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सर्व पक्षांनी सभागृहाच्या उच्च परंपरांचा मान राखत एकमताने ही निवड करण्याचा निर्णय घेतला. यामुळे संसदीय लोकशाही अधिक बळकट झाली असून, सभागृहाच्या सुदृढ परंपरा जपण्याची सामूहिक भावना अधोरेखित झाली आहे. उपसभापतीपदी सचिन अहिर यांची झालेल्या निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन करत, त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभव, संतुलित दृष्टिकोन आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचा सभागृहाच्या कामकाजाला निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सचिन अहिर यांनी विधानसभा सदस्य, राज्यमंत्री आणि विधान परिषद सदस्य म्हणून विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. जनसामान्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील भूमिका, अभ्यासू वृत्ती, निर्भीड कार्यशैली आणि सर्वांशी सुसंवाद राखण्याची क्षमता ही त्यांची जमेची बाजू असून, उपसभापतीपदाची जबाबदारी ते समर्थपणे पार पाडतील. उपसभापती पद हे घटनात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असून, या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीने सर्व सदस्यांना समान न्याय देणे अपेक्षित असते. सचिन अहिर आपल्या संयमी, निष्पक्ष आणि सर्वसमावेशक कार्यपद्धतीमुळे सभागृहाच्या गौरवशाली परंपरांना अधिक बळकटी देतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

    यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कार्याचाही गौरव केला. महिलांवरील अत्याचार, दलित, पीडित आणि वंचित घटकांच्या प्रश्नांबाबत त्यांनी घेतलेली संवेदनशील आणि निष्पक्ष भूमिका उपसभापतीपदाची प्रतिष्ठा अधिक उंचावणारी ठरल्याचे त्यांनी नमूद केले. विधान परिषद उपसभापतीपदाची समृद्ध परंपरा अधोरेखित करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, रा. सू.गवई, सूर्यभान वहाडणे आणि वसंतराव डावखरे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी या पदाची गौरवशाली परंपरा निर्माण केली आहे. सचिन अहिरही ही परंपरा अधिक सक्षमपणे पुढे नेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    सचिन अहिर यांच्या सार्वजनिक जीवनाचा आढावा घेताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, १९९३ मध्ये कामगार चळवळीतून त्यांनी सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. १९९९ ते २०१४ या काळात ते सलग तीन वेळा विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले. गृहनिर्माण, सामाजिक न्याय, पर्यावरण, खनिकर्म आणि आदिवासी विकास या विविध विभागाचे राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली. तसेच मुंबईतील सामाजिक, सांस्कृतिक आणि संघटनात्मक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सचिन अहिर विधान परिषद उपसभापती म्हणून  सभागृहाचे कामकाज निष्पक्ष, संयमी आणि सर्वसमावेशक पद्धतीने चालवतील. त्यांच्या कार्यकाळात सभागृहाची गौरवशाली परंपरा अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी  शुभेच्छा दिल्या. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. अशिष शेलार व अन्य सदस्यांनीही मनोगत व्यक्त करुन उपसभापती सचिन अहिर यांचे अभिनंदन केले.

    00000

    शैलजा पाटील/मोहिनी राणे/स.सं.

     

    मुख्यमंत्र्यांकडून विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांचा सभागृहाला परिचय

    मुंबई, दि. १: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांचा परिचय सभागृहास करून दिला.

    मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे सभागृहात स्वागत करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

    0000

    शैलजा पाटील/विसंअ

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *