• Mon. Jun 29th, 2026

    नसरापूर प्रकरणातील निकालाचे राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून स्वागत – अध्यक्ष ॲड. संजय पुराणिक – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 29, 2026
    नसरापूर प्रकरणातील निकालाचे राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून स्वागत – अध्यक्ष ॲड. संजय पुराणिक – महासंवाद

    मुंबई, दि. २९ : नसरापूर येथील अल्पवयीन बालिकेसंदर्भातील गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीस फाशीची शिक्षा सुनावल्याचा निकाल हा बालकांच्या संरक्षणासाठी अस्तित्वात असलेल्या न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करणारा असल्याचे महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष ॲड. संजय पुराणिक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

    या प्रकरणाच्या तपासापासून ते न्यायालयीन प्रक्रियेपर्यंत कर्तव्यनिष्ठेने काम करणाऱ्या पोलीस यंत्रणा, सरकारी अभियोक्ता, वैद्यकीय अधिकारी, महिला व बाल विकास विभाग, साक्षीदार तसेच संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आयोगाने अभिनंदन केले आहे. बालकांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध यंत्रणांनी साधलेला प्रभावी समन्वय अनुकरणीय असल्याचेही त्यांनी नमूद केले.

    बालकांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये वेळेवर तक्रार नोंदविणे, संवेदनशील व गुणवत्तापूर्ण तपास करणे, पुराव्यांचे शास्त्रशुद्ध संकलन आणि न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडणे यांचे महत्त्व या निकालातून अधोरेखित झाले आहे. हा निकाल केवळ एका प्रकरणापुरता मर्यादित नसून बालकांविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांना कायद्यापासून कोणतीही सुटका नाही, असा स्पष्ट आणि ठोस संदेश समाजात पोहोचविणारा आहे.

    महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने सर्व पालक, शिक्षक, सामाजिक संस्था आणि नागरिकांना बालकांच्या सुरक्षिततेबाबत अधिक सजग राहण्याचे आवाहन केले आहे. बालकांवरील अत्याचार, शोषण किंवा कोणतीही संशयास्पद घटना निदर्शनास आल्यास त्याची तात्काळ माहिती संबंधित यंत्रणांना देऊन बालकांच्या संरक्षणासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही आवाहन आयोगाने केले आहे.

    ०००

    श्रध्दा मेश्राम/विसंअ

     

     

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *