• Mon. Aug 17th, 2026

ॲमेझॉनला महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jun 24, 2026
ॲमेझॉनला महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

मुंबई, दि. २४ : ‘डेटा सेंटर्स’ क्षेत्रात महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे. डेटा सेंटरचा विस्तार आणि विकासासाठी राज्यात उत्तम परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे. केवळ डेटा सेंटर्स नाही, तर राज्यात आरोग्य, तंत्रज्ञान विषयक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कौशल्य विकास यामध्ये मोठ्या गुंतवणुकीच्या संधी आहेत. त्यामुळे ॲमेझॉनने राज्यामध्ये गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हॉटेल ताज पॅलेस येथे ॲमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्री जेसी यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गुंतवणुकीच्या संधीवर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बळगन, विकास आयुक्त (उद्योग) कादंबरी बलकवडे, ॲमेझॉन एडब्ल्यूएसचे कंट्री हेड संदीप दत्ता, ॲमेझॉन ग्लोबलचे कंट्री हेड समीर कुमार, एडब्ल्यूएसचे पब्लिक पॉलिसी संचालक विक्रम श्रीधरन, ग्लोबल ॲमेझॉनचे उपाध्यक्ष धर्मेश मेहता उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने देशातील अग्रणी राज्य आहे राज्याची अर्थव्यवस्था ६६० अब्ज डॉलर्स इतकी आहे.  राज्याने २०३० पर्यंत ‘ वन ट्रिलियन डॉलर’  अर्थव्यवस्था होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यापैकी अर्धे अधिक उद्दिष्ट राज्याने पार केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोगावर आधारित विविध प्रयोग राज्याच्या शासन व्यवस्थेमध्ये करण्यात येत आहे. त्यामुळे निश्चितच नागरिकांना सुलभ आणि सहजरित्या शासकीय सेवांचा लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. कृषी, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित व्यवस्थांची उभारणी करण्यात येत आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोगाने रोजगाराच्या स्वरुपामध्ये बदल होत आहेत. त्यामुळे या तंत्रज्ञानावर आधारित कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्र कौशल्य विकासामध्ये ॲमेझॉनसोबत काम करण्यास इच्छुक आहे. यासोबतच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल आहे. या क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोगावर आधारित कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात महाराष्ट्रात आवश्यक असलेली परिसंस्था विकसित करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हे डेटा सेंटर विकसित करण्यासाठी देण्यात येणाऱ्या सुविधांचा विस्तार करीत आहे. तसेच ‘सार्वजनिक क्लाउड धोरण’ लागू करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे. यामध्ये यापूर्वीच ॲमेझॉनसोबत शासनाने पब्लिक क्लाऊडमध्ये काम केले आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी राज्याने स्वतःची डेटा सेंटर धोरण जाहीर केले आहे. ज्यामध्ये ‘ ग्रीन डेटा सेंटर’ चा समावेश आहे. डेटा सेंटरसाठी पारंपारिक ऊर्जेच्या उपयोगाऐवजी अपारंपारिक क्षेत्रातून ऊर्जेचा उपयोग करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. ग्रीन डाटा सेंटरसाठी राज्याने सवलतीपण दिल्या आहेत.

नवी मुंबई येथे मेडिसिटी उभारण्यात येत आहे. या ठिकाणी संपूर्ण उपचार पद्धतीची साखळीच निर्माण करण्यात येणार आहे. अशा मेडिसिटीच्या माध्यमातून ॲमेझॉनला आरोग्य क्षेत्रातही गुंतवणूक करण्याची संधी आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

००००

निलेश तायडे/विसंअ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed