• Sat. Jun 27th, 2026

    संदीप दहिसरकर यांनी घेतली राज्यपालांची भेट; कला इतिहास दस्तावेजीकरणावर चर्चा – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 24, 2026
    संदीप दहिसरकर यांनी घेतली राज्यपालांची भेट; कला इतिहास दस्तावेजीकरणावर चर्चा – महासंवाद

    मुंबई, दि. २४ : कला इतिहासकार व लेखक संदीप दहिसरकर यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची महाराष्ट्र लोक भवन येथे भेट घेऊन त्यांना आपल्या दोन नव्या पुस्तकांच्या प्रती भेट दिल्या.

    यावेळी दहिसरकर यांनी आपल्या ‘अ कपल ऑफ डिफरंट स्ट्रोक्स: व्ही बी पाठारे अँड प्रेमा व्ही पाठारे’ तसेच ‘राव बहादूर एम व्ही धुरंधर: अ पेंटर फ्रॉम द बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट’ या दोन पुस्तकांची माहिती दिली. यावेळी त्यांनी पाठारे दाम्पत्याच्या कार्याची तसेच धुरंधर यांच्या कला योगदानाची माहिती देताना कलेच्या दस्तावेजीकरणाचे महत्व अधोरेखित केले.

    व्ही.बी. पाठारे व प्रेमा पाठारे हे राज्यातील महाराष्ट्रातील समर्पित पहिले कलाकार दाम्पत्य होते. त्यांनी काढलेले महात्मा फुले व डॉ आंबेडकर यांची तैलचित्रे विधानभवनात लावली असल्याचे त्यांनी सांगितले. पाठारे यांनी मुंबई ते पेशावर सायकलने परिक्रमा केली होती . देशभरातील नऊ कलारत्नांमध्ये एकट्या बंगालमधील सहा कलाकारांचा समावेश आहे.  त्यामध्ये रवींद्रनाथ टागोर, अवनींद्रनाथ टागोर, नंदलाल बोस, जामिनी रॉय यांचा समावेश आहे तसेच अमृता शेरगील व रवी वर्मा यांचा समावेश आहे. परंतु पाठारे, धुरंधर यांच्या कार्याचे दस्तावेजीकरण झाले नसल्याने बॉम्बे स्कूलच्या कार्याची पुरेशी दखल घेतली गेली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

    दहिसरकर यांच्या कार्याचे कौतुक करताना आपण महाराष्ट्रातील लुप्त होत असलेल्या कला व लोककलांच्या जतनाचे कार्य हाती घेतले असल्याचे राज्यपालांनी सांगितले व या कार्यात सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. बंगालच्या कलाकारांना त्रिपुराच्या राजघराण्याने राजाश्रय दिला असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    यावेळी ज्येष्ठ चित्रकार व्ही. बी. पाठारे आणि प्रेमा पाठारे यांचे सुपुत्र वास्तुविशारद शिरीष पाठारे तसेच पॉप्युलर प्रकाशनच्या अस्मिता मोहिते उपस्थित होत्या.

    0000

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed