• Sat. Jun 20th, 2026

    माजी केंद्रीय मंत्र्याला पक्षातून काढलेलं, खासदारकीही गेलेली; ठाकरेसेनेतील बंडानंतर ‘तो’ किस्सा चर्चेत

    माजी केंद्रीय मंत्र्याला पक्षातून काढलेलं, खासदारकीही गेलेली; ठाकरेसेनेतील बंडानंतर ‘तो’ किस्सा चर्चेत

    Shiv Sena UBT Split: शिवसेनेच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याआधी ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या ६ खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. पण हे खासदार आज शिंदेसेनेच्या व्यासपीठावर दिसण्याची शक्यता कमीच आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: शिवसेनेच्या दोन्ही गटांचे वर्धापनदिन आज साजरे होत आहेत. मुंबईच्या गोरेगावातील नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे षष्णमुखानंद हॉलमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापनदिन सोहळा संपन्न होत आहे. लोकसभेतील ठाकरेंच्या पक्षाच्या ९ पैकी ६ खासदार फुटलेले आहेत. ते शिंदेसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे हे ६ खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यक्रमाला आयोजित राहणार का, याची उत्सुकता आहे.

    शिवसेना उबाठाचे संजय दिना पाटील, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील-आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे शिंदेसेनेच्या वाटेवर आहेत. ठाकरेसेनेनं बोलावलेल्या बैठकीला ते अनुपस्थित राहिले होते. पक्षानं व्हिप बजावूनही त्यांनी बैठकीला दांडी मारली. पण या खासदारांनी अद्याप तरी अधिकृतपणे शिंदेसेनेत प्रवेश केलेला नाही. लोकसभा अध्यक्षांकडे त्यांनी वेगळा गट स्थापन करण्याचं पत्र दिल्याची चर्चा आहे. पण लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिल्याचा, त्यांची भेट घेतल्याचा फोटो किंवा अन्य कोणता पुरावा अद्याप तरी समोर आलेला नाही. त्यामुळे हे फुटीर खासदार शिंदेसेनेच्या मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता अतिशय कमी आहे.
    Maharashtra TimesAditya Thackeray: ओमराजेंकडून बंडानंतर गंभीर आरोप; आदित्य ठाकरेंकडून आता जोरदार पलटवार; खासदारांच्या पक्षांतराचं कारण सांगितलं!
    अन्य पक्षाच्या मंचावर उपस्थिती अन् बड्या नेत्याची हकालपट्टी
    बिहारच्या राजकारणातील एकेकाळचे बडे नेते शरद यादव यांची संयुक्त जनता दलाकडून हकालपट्टी झाली होती. विशेष म्हणजे २००३ मध्ये त्यांनीच संयुक्त जनता दलाची स्थापना केली. २०१६ पर्यंत तेच या पक्षाचे अध्यक्ष राहिले. पण त्यानंतर त्यांनी नितीश कुमार यांना संधी दिली. २०१७ मध्ये शरद यादव यांची नितीश कुमार यांनी पक्षातून हकालपट्टी केली गेली. कधीकाळी केंद्रात नागरी उड्डाण मंत्री राहिलेल्या शरद यादव यांना त्यांनीच स्थापन केलेल्या पक्षातून काढण्यात आलं. त्यांची राज्यसभेची खासदारकीदेखील काढून घेण्यात आली.

    नेमकं काय घडलेलं?
    २०१५ मध्ये बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्या महागठबंधननं दणदणीत विजय मिळवला. देशात नरेंद्र मोदींची लाट असताना महागठबंधननं भाजपला बिहारमध्ये पाणी पाजलं. नितीश कुमार मुख्यमंत्री झाले. त्यावेळी शरद यादव जेडीयूचे अध्यक्ष होते. २०१६ मध्ये त्यांनी अध्यक्षपद सोडलं. पक्षाची धुरा नितीश कुमार यांच्याकडे सोपवली.
    Maharashtra TimesUddhav Thackeray: ओमराजे…प्रेम बघितलं, आता रोष बघा! सोडून गेलेल्यांना दणका देण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन ठरला
    २०१७ मध्ये नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची साथ सोडून भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्याला शरद यादव यांनी कडाडून विरोध केला. हा जनादेशाचा अपमान असल्याची त्यांची भूमिका होती. नितीश कुमार यांच्याशी खटके उडत असताना, मतभेद अगदी टोकाला गेलेले असताना शरद यादव यांनी पाटण्यातील गांधी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या राजदच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. भाजप भगाओ, देश बचाओ रॅलीत यादव सहभागी झाले. सोबतच त्यांनी दिल्लीतील विरोधकांच्या संयुक्त संमेलनातही सहभाग घेतला.

    राजदच्या रॅलीत सहभागी झाल्याबद्दल यादव यांच्यावर पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवण्यात आला. उपराष्ट्रपतींशी संपर्क साधून त्यांचं राज्यसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं. यानंतर त्यांना पक्षातून काढण्यात आलं. पुढे शरद यादव यांनी लोकतांत्रिक जनता दल नावाचा पक्ष काढला. मग तो राजदमध्ये विलीन केला. स्वत: स्थापन केलेल्या पक्षातून यादव यांची हकालपट्टी झाली होती. जानेवारी २०२३ मध्ये यादव यांचं निधन झालं.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

    मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

    ‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

    टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

    लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

    लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

    २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

    शैक्षणिक पात्रता
    कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा