• Wed. Jun 10th, 2026

    सांस्कृतिक उपक्रमांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी – मंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 9, 2026
    सांस्कृतिक उपक्रमांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी – मंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद

    मुंबई, दि. ९ : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये काळानुरूप सुधारणा करून त्या अधिक प्रभावी, पारदर्शक आणि कलाकाराभिमुख करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री मंत्री ॲड. शेलार यांनी दिले.

    राज्यातील कला, संस्कृती आणि लोकपरंपरांच्या जतन-संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध पुरस्कार, शिष्यवृत्ती, अनुदान आणि कलाकार कल्याण योजनांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.

    महाराष्ट्र भूषण पुरस्कारासह गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्कार, ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार तसेच राज्य सांस्कृतिक व राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कारांच्या नियमावली आणि निवड प्रक्रियेचा सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला. गुणवत्ताधिष्ठित निवड, तज्ज्ञ समित्यांचा सहभाग आणि कालबद्ध पुरस्कार प्रक्रिया राबविण्याचे निर्देश यावेळी  मंत्री ॲड. शेलार यांनी दिले.

    राज्य सांस्कृतिक पुरस्कार आणि राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कारांत सुधारणा करून कलाक्षेत्रांची संख्या वाढविणे, नव्या कला प्रकारांचा समावेश करणे आणि अधिकाधिक गुणवंत कलाकारांना सन्मानित करण्याच्या प्रस्तावांवर यावेळी चर्चा झाली. राज्यातील विविध सांस्कृतिक क्षेत्रांतील ज्येष्ठ आणि युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कारांची व्याप्ती अधिक व्यापक करण्याचे, तसेच तमाशा, दशावतार, शाहिरी, खडीगंमत, संगीतबारी, भजनी मंडळे, झाडीपट्टी, नमन-खेळे, वहीगायन यांसारख्या पारंपरिक लोककला प्रकारांना अधिक प्रोत्साहन देण्याचे निर्देश यावेळी मंत्री ॲड. शेलार यांनी दिले. यामुळे ग्रामीण व लोककलावंतांना मोठा आधार मिळण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    यावेळी मंत्री ॲड. शेलार म्हणाले, राज्याचा सांस्कृतिक वारसा जपताना कलाकार, लोककलावंत आणि युवा प्रतिभावंतांना अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित सर्व योजनांचे आधुनिकीकरण, पारदर्शकता आणि परिणामकारकता वाढविण्यासाठी या उपक्रमांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड घ्यावी. त्यासाठी शक्य असतील ते सांस्कृतिक कार्यक्रम डिजिटल पद्धतीने घ्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed