• Fri. Jun 5th, 2026
    पुरंदरमधील नव्या टोलनाक्याचा ‘पीएमपी’च्या प्रवाशांना फटका, बस प्रवास महागला; कोणत्या मार्गावर परिणाम?

    Belsar Toll Plaza: पुरंदर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर बेलसर गावाच्या हद्दित टोलप्लाझा निर्माण करण्यात आला आहे. या मार्गावर टोलमाफीची मागणी स्थानिक करत असतानाच आता या मार्गावर बस प्रवाशांनाही या टोलवसुलीची झळ बसणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी, पुणे: सासवड-लोणंद रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. बेलसर (ता. पुरंदर) येथे सुरू झालेल्या नवीन टोलनाक्यामुळे या भागातून जाणाऱ्या बसना टोल लागू झाला आहे. परिणामी, हडपसरवरून जेजुरी एमआयडीसी, मोरगाव आणि नीरा गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना तिकिटासोबतच एक रुपयाचे अतिरिक्त टोल तिकीट काढावे लागणार आहे.

    कोणत्या मार्गांवरील प्रवाशांना फटका?

    पीएमपीच्या कात्रज डेपोकडील बस खेड-शिवापूर टोलनाक्यावरून, निगडी व बालेवाडी डेपोंकडील बस या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड (सोमाटणे) टोलनाक्यावरून, तर निगडी डेपोकडील बस कुसगाव (वरसोली) टोल प्लाझामधून मार्गस्थ होतात. या सर्व बसमधील प्रवाशांकडून सध्या प्रति प्रवासी एक रुपया याप्रमाणे टोल तिकीट आकारले जाते. याच नियमाच्या धर्तीवर आता बेलसर टोल प्लाझावरून धावणाऱ्या बसनाही हा नियम लागू करण्यात आला आहे.

    Maharashtra TimesDharavi Redevelopment: सरकारची ११ एकर जागा अदानींच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला, ‘बेस्ट’चे दोन आगार देण्यास समितीची मंजुरी

    बेलसर येथे २४ एप्रिल २०२६पासून नवीन टोल प्लाझा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे बसमार्ग क्रमांक २१० ‘हडपसर ते जेजुरी एमआयडीसी’, बसमार्ग क्रमांक २१२ ‘हडपसर ते मोरगाव’ आणि बसमार्ग क्रमांक २१३ ‘हडपसर ते नीरा गाव’ या तिन्ही बसमार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनादेखील टोल तिकीट आकारणी होणार आहे. प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे.

    ई-बससाठी पॉवर बॅकअप

    दरम्यान, पीएमपी बस डेपोवरील वीजपुरवठा खंडित झाला तरी चार्जिंग करता येईल यासाठी पर्याय शोधण्यास सुरूवात केली आहे. ही सेवा सुरू होऊन तब्बल सहा वर्ष झाले आहेत. पीएमपीच्या ई-बससाठी सध्या सात बस डेपो आहेत. यापैकी एकावरही पॉवर बॅकअपची सुविधा उपलब्ध नाही. गेल्या आठवड्यात भेकरानगर येथील वीज पुरवठा काही तासांसाठी खंडित झाला होता. त्यामुळे पीएमपीच्या तब्बल 50 फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यावेळी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती.

    Maharashtra TimesPune-Bengaluru Highway: तीन भुयारी ‘अंडरपास’मुळे प्रवास सुपरफास्ट, पुणे-बंगळुरू महामार्गावर मंजुरी; पुनावळे, वाकड परिसरात फायदा

    वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की इतर राज्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पर्यायांवर चर्चा केली जाणार आहे. डिझेलवर चालणारे जनरेटर वापरण्याचा पर्याय सोपा असला तरी तो योग्य नाही. ई-बस वापरण्यामागचं एकमेव कारण म्हणजे हरित उर्जेचा वापर करणे. पॉवर बॅकअपसाठीही डिझेलचा वापर करणं योग्य नाही. इतर पर्यायांची तापासणी करून त्याची अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

    शहरातील ई-बसेसची संख्या हळूहळू वाढत आहे. सात डेपोमध्ये ५३५ ई-बसेस उभ्या असतात. पीएमपीच्या ताफ्यात एका वर्षात आणखी १,००० बसेस दाखल होणार आहेत. अशा वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यावर बसेसच्या चार्जिंगचा मोठा प्रश्न निर्माण होतो.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा