• Sat. Jun 6th, 2026

    ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीताचे ‘सुमन’ कोमेजले : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 31, 2026
    ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीताचे ‘सुमन’ कोमेजले : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

    मुंबई, दि. ३१ : आपल्या अवीट गोडीच्या सुरांनी भारतीय संगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीताचे ‘सुमन’ कोमेजले असून त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

    उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात सुमन कल्याणपूर यांच्या सांगीतिक प्रवासाचा आणि त्यांच्या अमूल्य योगदानाचा गौरव केला. ते म्हणाले, सुमन कल्याणपूर या केवळ एक गायिका नव्हत्या, तर त्या भारतीय सुगम आणि चित्रपट संगीताचा एक सुवर्णकाळ होत्या. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजाच्या बळावर त्यांनी मराठी, हिंदीसह विविध भाषांमधील हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातील सात्त्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते.

    शोकसंदेशात उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, ‘शब्दावाचून कळले सारे’, ‘तूच सुखाचा सागर’, ‘केतकीच्या बनी तिथे’, ‘पाखरा जा रे जा’ यांसारखी अनेक भावगीते आणि चित्रपटगीते आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. त्यांनी गायलेली भक्तीगीते आणि कोळीगीते आजही तितकीच ताजी वाटतात. संगीताचा कोणताही औपचारिक वारसा पाठीशी नसताना त्यांनी केवळ स्वतःच्या प्रतिभेने आणि साधनेने संगीत जगतात आपले अढळ स्थान निर्माण केले, असल्याचे त्यांनी म्हटले केले.

    केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या अद्वितीय कामगिरीचा गौरव केला होता. त्यांचा सांगीतिक वारसा हा येणाऱ्या पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

    ००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed