• Sat. Jun 20th, 2026

    वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामांना गती द्या; गुणवत्तेबाबत तडजोड नको – मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 25, 2026
    वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामांना गती द्या; गुणवत्तेबाबत तडजोड नको – मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद

    मुंबई, दि. २५ : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या बांधकामांचा आढावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला. अलिबाग, नंदुरबार, वाशिम, अमरावती, गडचिरोली, धाराशिव, रत्नागिरी, पालघर आणि अंबरनाथ येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामांची सद्यस्थिती, निधी, पाणी व वीजपुरवठा तसेच कामातील अडचणींबाबत सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली. कामांना गती देत दर्जेदार वैद्यकीय सुविधा उभारण्यावर शासनाचा भर असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले .

    मंत्रालयात आयोजित बैठकीत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव धीरज कुमार आणि संबंधित अधिकारी तसेच संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, संबंधित वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

    मंत्री मुश्रीफ म्हणाले की, ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय शिक्षण आणि उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. अनेक प्रकल्पांना आशियाई विकास बँक (एडीबी), जायकायांसारख्या संस्थांकडून अर्थसहाय्य मिळत असून, कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.

    वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामांना रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत गरजा भागविण्यासाठी जिल्हाधिकारी , महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांनी समन्वयाने काम करुन वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत असे निर्देश मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी दिले.

    मंत्री मुश्रीफ म्हणाले ,सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ देऊ नये, निधी वितरण आणि प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी तसेच स्थानिक नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात.

    0000

    निलेश तायडे/वि.सं.अ

     

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed