• Sun. Jun 7th, 2026

    महसूल विभागाने जबाबदारी घेऊन कार्य करावे – अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 22, 2026
    महसूल विभागाने जबाबदारी घेऊन कार्य करावे – अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे – महासंवाद

    अमरावती, दि. २२ (जिमाका) : महसूल विभाग हा समाजासाठी कार्य करणारा विभाग आहे. त्यामुळे विविध परिस्थितीमध्ये अनपेक्षित जबाबदाऱ्या या विभागावर येतात. मात्र जनतेसाठी कार्य करावयाचे असल्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जबाबदारी घेऊन कार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले.

    जिल्हाधिकारी कार्यालयात आज श्री. खारगे यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. यावेळी विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंदा दानेज आदी अधिकारी उपस्थित होते.

    श्री. खारगे यांनी महसूलमधील अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस दौरा करावा. यामुळे प्रशासनावर पकड मजबूत करण्यास मदत होणार आहे. दौरा करताना विविध विकासकामांची तपासणी केल्यास तथ्य जाणून घेण्यास मदत मिळणार आहे. त्यासोबतच जनतेशी भेटावे. त्यांनी दिलेल्या निवेदनांवर सकारात्मक कारवाई करावी. निवेदनावर केलेली कारवाई कळवावी. यामुळे नागरिकांच्या अडचणी लक्षात येतात. हे सर्व करीत असताना अधिनस्त कर्मचाऱ्यांशी संवाद साधून समस्याही जाणून घ्याव्यात. प्रशासनाने नागरिकांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करावा. नागरिकांच्या समस्या, तक्रारींचा निपटारा करण्यासाठी व्यवस्था निर्माण करावी. त्यांच्या तक्रारींचा मागोवा घ्यावा. शासनने ईज ऑफ डुइंग बिझनेसचे धोरण स्विकारले आहे. त्यानुसार 12 दुरूस्ती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

    यावेळी जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी जिल्ह्याची संक्षिप्त माहिती दिली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणारे विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली. प्रामुख्याने जिल्ह्यात लोकसहभागातून निर्माण करण्यात येणाऱ्या पांदन रस्त्याची माहिती दिली. तसेच रहिवासी जमिन नियमानुकूल करणे, पट्टेवाटप करणे, मिळकत पत्रिका वाटप करणे याबाबत माहिती दिली.

    दरम्यान श्री. खारगे यांनी सकाळी अमरावती उपविभागीय अधिकारी कार्यालय, अमरावती तहसील कार्यालय, सहनिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय, वडाळी मंडळ अधिकारी कार्यालयाला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी कार्यरत कर्मचारी यांच्याकडून कामकाजाची माहिती घेतली.

    000000

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed