• Sat. Jun 6th, 2026
    पुण्यात टोळीसंघर्ष धोकादायक वळणावर, आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवर सापडायला नको, आंदेकर टोळीची चलाख युक्ती

    Pune Andekar vs Komkar Gang : आंदेकर टोळीकडून खून आणि खूनाच्या प्रयत्नांसाठी नवीन मुलांचा वापर केला जात असल्याचे तपासातून समोर येत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने बुधवारी सकाळी सातारा रस्त्यावर बालाजीनगर परिसरात रिक्षाचालक तरुणावर जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांनी गोळीबार आणि कोयत्याने वार करून खूनाचा प्रयत्न केला. एक गोळी तरुणाच्या मांडीत लागली, तर डोक्यात कोयत्याचे तीन ते चार गंभीर घाव झाले. यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    अक्षय ऊर्फ बाळा बापू म्हस्के (२६) असे जखमी तरुणाचे नाव आहे. अक्षय रिक्षाचालक असून, त्याचा भाऊ आकाश म्हस्के हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी आहे. वनराजच्या खूनापूर्वी उत्तर प्रदेशातून पिस्तूल आणण्यात आकाशची भूमिका असल्याचे समोर आले होते. आंदेकर टोळीने आरोपींच्या नातेवाइकांवर हल्ल्याचा इशारा दिल्याची चर्चा होती.

    हल्ल्यासाठी नवीन मुलांचा वापर

    दरम्यान, पुणे शहरातील टोळीसंघर्ष अधिकच धोकादायक वळणावर पोहोचला असून, आंदेकर टोळीकडून खून आणि खूनाच्या प्रयत्नांसाठी नवीन मुलांचा वापर केला जात असल्याचे तपासातून समोर येत आहे. गुन्हेगारीशी थेट संबंध नसलेल्या, पोलिसांच्या रेकॉर्डवर नसलेल्या तरुणांकडून हल्ले घडवून आणले जात असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

    खुनाचा बदला घेण्याची शपथ

    एक सप्टेंबर २०२४ रोजी सोमनाथ गायकवाड टोळीने गोळीबार आणि कोयत्याने हल्ला करून वनराज आंदेकरचा खून केला होता. या घटनेनंतर आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरने खुनाचा बदला घेण्याची शपथ घेतल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर खून व खुनाच्या प्रयत्नांची मालिका सुरू झाली.
    Maharashtra TimesPune News : पेपर फोडणाऱ्या वाटल्या नाहीत, दोन मनिषांबाबत शेजारी चकित; मांढरे पतीपासून विभक्त, आसपास कुजबूज; वाघमारेच्या नवऱ्याबद्दलही माहिती समोर

    नातेवाईकांनी पुणे सोडलं

    सूत्रांच्या माहितीनुसार, वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपींच्या नातेवाइकांनाच लक्ष्य केले जात आहे. संबंधितांना सतर्क राहण्याचा इशारा पुणे पोलिसांनी दिला असला, तरी अचानक नवीन मुलांकडून हल्ले होत असल्याने आरोपींच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आयुष कोमकर आणि गणेश काळे यांच्या खुनानंतर काही नातेवाइकांनी पुणे सोडल्याची माहितीही समोर आली आहे.

    Prabodh Davkhare यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, पहिली प्रतिक्रिया काय?

    कारागृहातून कार्यवाही आणि प्लॅनिंग?

    आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर आणि टोळीतील इतर सदस्य सध्या ‘मकोका’अंतर्गत कारागृहात आहेत. आंदेकर टोळीवर खुनाचे दोन आणि खंडणीचा एक असे तीन मकोका गुन्हे दाखल आहेत. मात्र, कारागृहात असतानाही बाहेर खून आणि खुनाचे प्रयत्न घडवून आणले जात असल्याने पोलिसांसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
    Maharashtra TimesCrime News : विवाहित बॉयफ्रेण्डसाठी सेल्सगर्लची ज्वेलरी शॉपमध्ये चोरी, 1.66 कोटींचे दागिने लंपास, आंघोळ करताना विश्वासघात अन् गेम पालटला
    वनराज आंदेकर खून प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत २१ जणांना अटक केली आहे. प्रत्यक्ष हल्लेखोर; तसेच त्यांना मदत करणाऱ्यांचा त्यात समावेश आहे. या प्रकरणात आकाश म्हस्के, समीर काळे, आबा खोंड आणि संगम वाघमारे यांना पिस्तूल पुरवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आकाश हा सोमनाथ गायकवाड टोळीतील महत्त्वाचा सदस्य असल्याचे सांगितले जाते. त्याच कारणातून त्याचा भाऊ अक्षय म्हस्केवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा