Nagpur Crime: सुटका केलेल्या ६५ जणांमध्ये १२ बालकांचा समावेश आहे. महिला आणि पुरुष, असे ५३ जण आहेत. सुटका केलेल्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यांना तत्काळ संरक्षण व समुपदेशन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
भर उन्हात बालकांच्या मदतीने भिक्षा मागितली जात असल्याचे चित्र शहराच्या चौकाचौकांत बघावयास मिळत होते. लहान मुलांना गुंगीचे औषध देऊन त्यांचा भिक्षेसाठी वापर होत असल्याचेही वेळोवेळी उघडकीस आले. यात या चिमुकल्यांचा जीव धोक्यात टाकला जातो. काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या या चिमुकल्यांची सुटका व्हावी आणि त्यांना चांगले आरोग्य आणि शिक्षण मिळावे, याबाबतचे वृत्त ‘मटा’ने वेळोवेळी प्रकाशित केले. प्रशासनाकडून कारवाई होत होती; मात्र, पुन्हा तेच चित्र बघावयास मिळत होते. मंगळवारी पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन मुक्ती अंतर्गत हे अभियान राबविण्यात आले.
Nagpur Politics: भाजपला हवी बिनविरोध निवडणूक; राजकीय पक्षांसोबत चर्चा करणार, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
कर्मचाऱ्यांना चावा घेण्याचा प्रयत्न
शहरातील मोक्याच्या ठिकाणी, जिथे भिक्षावृत्तीचे प्रमाण अधिक आहे, अशा भागांमध्ये संयुक्त पथकाने धडक कारवाई केली. कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांचा भिक्षेकऱ्यांनी चावा घेण्याचा प्रयत्न केला. शिव्या दिल्या जात होत्या. मारहाणीचे प्रयत्नही झाले. त्यामुळे काहीसा तणाव निर्माण झाला होता. मेयो हॉस्पिटल, मोमीनपुरा, गोळीबार चौक, महाल, गांधीबाग, संत्रा मार्केट, सीताबर्डी आणि रेल्वेस्टेशन परिसरात ही कारवाई करण्यात आली. सुटका केलेल्यांना वसतिगृह, बेघर निवारा केंद्र, बालगृह येथे ठेवण्यात आले आहे.
Nagpur News: बारा वर्षांचा संसार, पदरात 2 लेकरं, बायको घर सोडून गेली; कौटुंबिक कलहातून पतीचा टोकाचा निर्णय
१२ बालकांचा समावेश
या व्यक्तींच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली. ही मोहीम जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील मेसरे, पाचपावलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबुराव राऊत आणि तहसील पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांच्यासह या मोहिमेत चाइल्ड हेल्पलाइनचे प्रतिनिधी अनिकेत भिवगडे, मीनाक्षी धडाडे, पूजा कांबळे, सचिन धोतरकर व रणजीत कुंभारे यांच्यासह सह्याद्री फाउंडेशन, दिव्य वंदना फाउंडेशन, न्यू व्हिजन फाउंडेशन व ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यांचा सहभाग होता.
